उल्हासनगर - पालिकेतील अंबरनाथ ते कल्याण रस्ता रुंदीकरणात एक हजारपेक्षा जास्त व्यापारी बाधित झाले. त्यापैकी 250 दुकानदार पूर्ण बाधित झाले. तर अंशतः बाधित झालेल्या 80 टक्के दुकानदारांनी दुरुस्ती व पुर्नबांधणी केली. मात्र उर्वरित दुकानदारांनी बांधकामे सुरू करताच, पालिका आयुक्तांनी पाडकाम कारवाई सुरू केल्याचा आरोप दुकानदारांनी केला. एकाच दुकानाचे काम कागदपत्र असताना वारंवार तोडल्याच्या निषेधार्थ दुकानदारांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेउन जाब विचारला. आयुक्तांनी अधिकृत व नियमानुसार कामालाच परवानगी देतो. असे सांगताच व्यापारी संतप्त झाले. त्यांनी इतर व्यापारी व आम्हांला दुसरा न्याय का? असा प्रश्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना शिवीगाळ केली आहे.
या प्रकारानंतर दुकानदार व व्यापाऱ्यांनी शहर व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने पुन्हा अंबरनाथ ते कल्याण रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, आयुक राजेंद्र निंबाळकर रागारागात पालिकेतून निघून गेले आहे. एकूणच पालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.