गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:46 AM2018-09-10T03:46:05+5:302018-09-10T03:46:16+5:30

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुुरू केला, तेव्हा त्यामागे ध्येयवाद होता. आता या उत्सवाचे व्यापारीकरण झाले आहे.

Shopping for shopping for Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

Next

- जान्हवी मोर्ये
कल्याण-डोंबिवली- लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुुरू केला, तेव्हा त्यामागे ध्येयवाद होता. आता या उत्सवाचे व्यापारीकरण झाले आहे. घरगुती गणेशस्थापना टिळकांच्याही आधीपासून केली जात होती. मात्र, सार्वजनिक स्वरूप प्राप्त होताच घरगुती गणेशपूजनाची संख्याही वाढली. नागरी जीवनाच्या धावपळीत घरातील गणेशाच्या पूजनासाठी लागणाऱ्या वस्तू घरी करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सगळी मदार विकतच्या वस्तू खरेदी करण्यावर असते. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बाजारखरेदीची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
उकडीचे मोदक महागले
मनोज भावर्थे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी उकडीच्या मोदकाचा एक नग १८ रुपयांना होता. त्यात दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २१ उकडी मोदकांचा नैवेद्य दाखवण्यासाठी भक्ताला ४२० रुपये मोजावे लागणार आहेत. उकडी मोदकाला जास्त मागणी असते. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या आवडीनुसार मावा, केसर, कंदी, सफेद मावा मोदकही आहेत. त्याचा भाव उकडी मोदकापेक्षा कमी असला, तरी ते नगाप्रमाणे विकले जात नाहीत. त्याची किंमत किलोप्रमाणे असते. या एक किलो मोदकासाठी ५४० रुपये मोजावे लागणार आहेत. गणेशाला मोतीचूर लाडू पसंत असतो. शुद्ध तुपातील मोतीचूर लाडू ४४० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत.
>पूजेसाठी पाच फळे...
व्यापारी योगेश मोरवे यांनी सांगितले की, गणेशासमोर फळे ठेवण्यासाठी आकर्षक अशा गोल्डन व सिल्व्हर प्लेट आहेत. या प्लेटमध्ये ५० वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. या प्लेट वूलन, चांदीवर्क, हॅण्डल टोपली या विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. या प्लेट ४० रुपयांपासून ५४० रुपयांपर्यंत आहेत. या आकर्षक प्लेट ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेशपूजनासाठी पाच फळे लागतात. फळांची एक बास्केटच तयार केली आहे.
त्यात पाच प्रकारची फळे उपलब्ध आहेत. फळांचा दर्जा, आकार यावरून १०० ते ४०० रुपये असा दर आहे. गणेशोत्सव काळात फळांच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ होते. त्याचबरोबर कुठेही गणेशदर्शनाला जाताना नवे काही घेऊन जायचे असल्यास सुकवलेल्या फळांची प्लेटही उपलब्ध आहे. मोदक किंवा मिठाई गणेशदर्शनाला नेण्यापेक्षा सुकवलेल्या फळांची प्लेट नेणे अधिक चांगले आणि पौष्टिक आहे. २०० रुपये पावप्रमाणे यासाठी दर आकारला जात आहे.
गणेशाचा पाट
घरगुती गणेशाची स्थापना लाकडी पाटावर केली जाते. गणेश कलामंदिरातून मूर्ती घेतल्यावर ती पाटावर घेऊन घरी विधिवत आणली जाते. हा एक पाट बाजारात १३० ते ५३० रुपये किमतीचा आहे. पाटाच्या आकारावरून त्याचा दर कमीजास्त आहे.
गणेशाचा प्रसाद...
बुंदी लाडू १६० रुपये, तर तीळगूळ, शेंगदाणा मिक्स प्रसाद १२० रुपये किलो आहे. कॅडबरी मोदकाची किंमत ६०० रुपये किलो आहे. प्रसादाच्या किमती स्थिर आहेत. त्यात वाढ झाली नसल्याचे विक्रम सिंग यांनी सांगितले.
केळीचे पान


गणेशपूजनानिमित्त घरात आलेल्या पाहुणे मंडळींना केळीच्या पानावर भोजन दिले जाते. केळीची तीन पाने बाजारात ३० रुपये दराने विकली जात आहेत. श्रावण महिन्यात तीन पाने १५ रुपये दराने विकली गेली. गणेशोत्सवात त्यात वाढ झाली आहे. ही पाने बदलापूरहून आणून डोंबिवलीत विकणाऱ्या महिलेने ही माहिती दिली.
अगरबत्ती, अष्टगंध...
आशीष वैद्य यांनी सांगितले की, पूजेचे साहित्य १२१ रुपयांचे आहे. नैसर्गिक अष्टगंध, त्याचबरोबर रसायनमिश्रित नसलेली आणि हाताने वळलेली दीर्घकाळ सुगंध देणारी अगरबत्ती उपलब्ध आहे. अगरबत्त्यांमध्ये ४० प्रकार असून त्यात चाफा, मोगरा, केवडा आदींचा समावेश आहे. ८ ते ४८ इंचांपर्यंत अगरबत्ती आहे. वनस्पती पत्री आहे. त्याची किंमत १५० रुपये असून त्यात २१ वनस्पतींचा समावेश आहे.
>गणेशालंकाराच्या किमती स्थिर
गणेशाचे अलंकार विकणारे सुनील वीर यांनी माहिती दिली की कंठी, सोनपट्टी, बाजूबंद, मोदक, त्रिशूल, शाल, हत्ती, उंदीर, जास्वंद फुल, पिवळा चाफा, केवडा फुल हे सगळे सोन्याचा मुलामा दिलेले आहेत. यासह गोल्डन फ्रूटप्लेट आहे. गणेशाच्या बालीला जास्त मागणी आहे. गणेशालंकाराचे मार्केट गेल्या दोन वर्षांपासून मंद आहे. मोतीकंठी १०० रुपयांपासून दोन हजार रुपये किमतीची आहे. मंदीचा फटका बसल्याने गणेशालंकारात भाववाढ नाही.
फडके, मानपाडा रस्ते गर्दीने फुलले
डोंबिवली ही साहित्य संस्कृतीची पंढरी. सर्वच उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठीबहुल लोकवस्ती असलेल्या डोंबिवलीत गणेशोत्सवही अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यासाठी होणारी खरेदीही तितक्याच जोरात सुरू आहे. फडके रोड, मानपाडा रोड तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील बाजार गणेशाच्या खरेदीसाठी फुलून गेलेला आहे.
भाजीपाल्यात १५ ते २० टक्के वाढ...
भाजीविक्रेते दिनकर कोपरकर यांनी सांगितले की, भाजीमध्ये हिरवा वाटाणा हा राजा समजला जातो. त्याचा भाव ४० रुपये किलो होता. आता हिरवा वाटाणा ९० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. फ्लॉवर ४० रुपये किलो दराने विकले जात होते. त्यात वाढ होऊन ६० रुपये किलो दराने विकले जात आहे. कुंदलाल दिवाकर यांनी माहिती दिली की, मेथीची जुडी १० रुपये होती. ती आता २० रुपये दराने विकली जात आहे.
कोकणात जाण्यासाठी खासगी बसचे भाडे जास्त
कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन विकास महामंडळाने जास्त गाड्या सोडल्या आहेत. डोंबिवलीतही कोकणवासीय मोठ्या प्रमाणात राहतात. त्यापैकी काही जण कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे जास्त असल्याने कोकणात जाणाºयांनी कोकण रेल्वेला पसंती दिली आहे. मात्र, रेल्वेचे आरक्षण फुल्ल
झालेले आहे. त्यामुळे ज्यांना रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही, त्यांनी खाजगी बसला पसंती दिली आहे. खाजगी बसवाले एका प्रवाशामागे ८०० रुपये प्रवासभाडे आकारत असल्याची माहिती खासगी बसचा व्यवसाय करणारे प्रकाश मालवणकर यांनी दिली आहे. प्रवासी भाडे वाढण्यामागे डिझेलची दरवाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
>सजावटीचा झगमगाट...
विक्रेते चंद्रकांत सावंत यांनी सांगितले की, सजावटीसाठी फुलांचे व मोत्यांचे हार आहेत. त्यांची किंमत ६० ते १५० रुपयांदरम्यान आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांची खरेदी केली जाते. यंदा या साहित्यात १० ते १५ टक्के दरवाढ झाली आहे. मणिहारांना ग्राहकांची जास्त पसंती आहे.
रोषणाईच्या साहित्यात यंदा विशेष दरवाढ नाही. लायटिंगची किंमत १२० ते ३०० रुपये इतकी आहे. गणेशासाठी रूमाल २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत, तर शेला ६० ते ३०० रुपये किमतीचा आहे. फेट्याची किंमत ८० ते १२५ रुपये आहे. गणेशाच्या शिरावरील छत्री ९० ते २५० रुपये दराची आहे. इलेक्ट्रिक समईची किंमत १४० ते ३८० रुपये आहे.
गणेशामागे लावण्यासाठी फिरत्या चक्राची किंमत १५० रुपये असून त्यासोबत स्टॅण्डही दिले जाते. विनास्टॅण्ड चक्राची किंमत ६० रुपये आहे. अन्य एक विक्रेते नरेंद्र जैन यांनी सांगितले की, लालटेन लाइट हा यंदा नवा प्रकार बाजारात आला आहे. गणेशमूर्तीवर फोकस पाडण्यासाठी याचा वापर करता येईल. या फोकस लाइटची किंमत १०० ते ६०० रुपये दरम्यान आहे.

Web Title: Shopping for shopping for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.