लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये महापालिकेने सम - विषम पद्धत आता बंद करून दुकाने - व्यवसाय नियमित सुरु करण्यास परवानगी द्या अशी मागणी प्रताप सरनाईक व गीता जैन या शहराच्या दोन्ही आमदारांनी महापालिका आयुक्तां कडे केली आहे . लोकांची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे . त्याच बरोबर नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जबाबदारीने मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आमदारांनी केले आहे .
मीरा भाईंदर मध्ये 11 जुलै पासून दुकानांना सम विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी आहे . कोरोनाच्या संसर्गाचा मुळे मार्च अखेरीस पासून भाजीपाला , दूध , किराणा, औषधे आदी अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील व्यवसाय , दुकाने , बाजार आदी सर्व तीन महिन्यां पेक्षा जास्त काळ बंद आहे . शहरातील स्टील उद्योग तसेच अनेक लहान मोठे कारखाने बंद होते .
यामुळे सगळ्यांचेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असून लहान - सहान नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे . कोरोनाची लागण सुरु होऊन चार महिने उलटले असून आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज शंभरच्या आसपास जात आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे . पालिकेने घरोघरी सर्वेक्षण चालवले आहे . शिवाय झटपट अशी अँटीजेन चाचणी सुरु केली गेली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये व त्याची लागण होऊ नये यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतानाच शहरातील नागरिकांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्याची नितांत आवश्यकता आहे . नागरिकांच्या हाताला काम नाही मिळाल्यास अनेकांवर उपासमारीची पाळी येईल आणि यातून भयंकर असे सामाजिक प्रश्न उभे राहतील अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मांडली आहे .
आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सर्व बाबींचा सारासार विचार करून मीरा भाईंदर मधील सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्यासाठी सुधारित आदेश काढून सम विषम पद्धत बंद करावी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिशन बिगिन अगेन धोरणाचे पालन केले जावे . गर्दी व संसर्गाची धास्ती आहे आणि शासनाने देखील निर्बंध कायम ठेवले आहेत अश्या आस्थापना वगळून शहरातील सर्व दुकाने - व्यवसाय नियमितपणे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली आहे .
शासन, महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत . बहुतांश नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे , गर्दी न करणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी जबाबदाऱ्या घेत आहेत . पण जे बेजबाबदार लोक निर्देश पळत नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील करणे आवश्यक आहे असे आ . सरनाईक म्हणाले .