बदलापूर : बदलापूर शहराला वीज पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे थेट टाटा पॉवर कंपनीकडून बदलापूरसाठी वीज घेण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी टाटा कंपनीला पालिकेचा आरक्षित भूखंड देण्यावरून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
बदलापूरकरांची भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी आ. कथोरे प्रयत्न करीत असताना या प्रकल्पासाठी टाटाला मोफत जागा देऊ नका, अशी भूमिका खा. पाटील यांनी घेतली. भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना अंधारात चाचपडावे लागणार आहे.
बदलापूरला अपेक्षेपेक्षा १०० ते १२० केव्ही वीज पुरवठा अपुरा पडत आहे. वीज वितरण कंपनीला बदलापूर शहरासाठी मुबलक वीज उपलब्ध होत नसल्याने टाटा कंपनीकडून वीज घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. बदलापूरमधून टाटा कंपनीचे जे वीज टॉवर गेले आहेत, त्या टॉवरवरून २०० ते २५० केव्हीपर्यंतचा वीजपुरवठा शहरासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी कात्रप परिसरातील पाच एकर जागा टाटा कंपनीला देण्याचा प्रस्ताव तयार केला. याच प्रस्तावावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला.
मंत्री व आमदारांमध्ये एकमत होईनापाटील आणि कथोरे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. टाटा कंपनीला वीज पुरवठा करण्याकरिता जागा देण्यावरून उभयतांमध्ये जुंपली. माध्यमांसमोर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना टाटा कंपनी ही खासगी कंपनी असल्यामुळे आरक्षित जागा त्यांना मोफत देऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली. कथोरे यांनी टाटाची वीज बदलापूरला मिळावी, यावर आपण ठाम असून, नेमका प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्या, असा सल्ला विरोधकांना नाव न घेता दिला.