उल्हासनगर : मालमत्ता कर विभागासाठी लागू केलेल्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, गेल्या ११ दिवसांत फक्त १० कोटी तर एकूण ४७ कोटींची वसुली झाली आहे. कर निर्धारक - संकलक जेठानंद करमचंदानी यांनी अभय योजनेत आजपर्यंत १० कोटींची वसुली झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, वसुलीसाठी प्रशासन अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
उल्हासनगरवासीयांना कोरोना काळात दिलासा देण्यासाठी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी पुढाकार घेऊन मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लावण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. गेल्या महिन्यात महापौर, उपमहापौर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन टप्प्यांतील अभय योजना जाहीर केली. तसेच ३१ मार्चअखेर वसुलीचे लक्ष्य १०० कोटींचे ठेवले आहे. १८ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान ८० टक्के तर ८ ते ३१ मार्चदरम्यान ५० टक्के मालमत्ता कर बिलावरील व्याज माफ अशी दोन टप्प्यांतील अभय योजना जाहीर केली. मालमत्ता कर विभागाची एकूण थकबाकी ५२० कोटींपेक्षा जास्त असून १ लाख ७७ हजार एकूण मालमत्ताधारक शहरात आहेत.
कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महासभेत अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव आणला होता. गेल्या महिन्याची महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर, उपमहापौर यांनी अभय योजना जाहीर करून नागरिकांना दिलासा दिला. जास्तीतजास्त वसुली होण्यासाठी योजनेची जनजागृती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया करमचंदानी यांनी दिली. तसेच एका खाजगी कंपनीकडून मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू असून मालमत्तेची वसुली वाढण्याचे संकेत शिवसेना नेते अरुण अशान यांनी दिली.
चौकट
मालमत्ता कर वसुलीचा विक्रम मोडणार?
अभय योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे उपायुक्त मदन सोंडे व कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी केले आहे. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असल्याने वसुलीचे विक्रम मोडणार असल्याची प्रतिक्रिया सोंडे यांनी दिली.