अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक असून ते केवळ चार दिवस पुरणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने पाच हजार डोसची मागणी केली आहे.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत. जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढत नाही तोपर्यंत केंद्र वाढविण्यात काही एक अर्थ नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली जात आहे. दररोज हजार नागरिकांना लस देता येईल त्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, लसींचा पुरवठा अल्प असल्याने २५० नागरिकांना त्रास देणे शक्य होत आहे. आजघडीला अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एक हजार लस शिल्लक असून ते अवघे तीन ते चार दिवसच पुरवणार आहेत. अल्पप्रमाणात लस शिल्लक असल्याची बातमी नागरिकांपर्यंत जात असल्याने आता डोस घेण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे टोकण मिळवण्यासाठी पहाटे सहा वाजल्यापासून नागरिक रांग लावत आहेत.
बदलापुरातदेखील लसींचा पुरवठा बंद असल्याने अवघे दोन दिवस पुरेल एवढ्या लस शिल्लक असून बदलापूर पालिकेने पाच हजार लस उपलब्ध व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. बदलापुरातदेखील चार केंद्रांमध्ये दररोज २५० नागरिकांना लस देण्यात येत असून त्या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.