अंबरनाथ : राज्यभरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. यावर उपाय म्हणून ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट खासगी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्याची योजना सुरू केली होती. मात्र, यातही आता मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना पुन्हा इंजेक्शनसाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील १८५ खासगी हॉस्पिटलना इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या १८५ हॉस्पिटलमध्ये मिळून पाच हजार ७४२ रुग्ण दाखल असताना अवघे चार हजार ३६ इंजेक्शन्सचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही मधली १७०६ इंजेक्शनची तूट भरून काढण्यासाठी खासगी हॉस्पिटलकडून रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे शासनाकडून इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा गाजावाजा केला जात आहे, तर प्रत्यक्षात रुग्णाच्या नातेवाइकांची फरपट सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत खासगी हॉस्पिटल प्रशासनाला विचारले असता आम्हाला मागणीपेक्षा कमी पुरवठा केला जात असल्याने आम्हीही हतबल असल्याचे त्यांनी सांगितले. तर शासनाने इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.
काेट
रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा होत असतानाही रुग्णांच्या नातेवाइकांना त्यासाठी बाहेर भटकंती करावी लागत आहे. ही बाब गंभीर आहे. रुग्णालय प्रशासनानेही याबाबत त्यांची नाराजी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणे गरजेचे आहे.
- योगेश पाटील, विभाग अध्यक्ष, मनसे
%%%
रुग्णांच्या संख्येप्रमाणे आणि त्यांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनप्रमाणे आम्ही नगरपालिकेकडे मागणीचे पत्र देत आहोत. मात्र, ज्या प्रमाणात मागणी केली जात आहे, त्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे काही रुग्णांना बाहेरून इंजेक्शन मागण्याशिवाय पर्याय आमच्याकडे नाही.
- उमेश वाणी, मॅनेजर, साई सिटी हॉस्पिटल
----------------------------------------------