मुंबई - शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, रायगड, ठाणेसह नवी मुंबईकरांचे मेगा हाल झाले. शनिवारी पहाटेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाने आपला मारा कायम ठेवला. शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर कल्याणसह परिसरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली होती. तर, कल्याणच्या पुढेही लोकल वाहतूकही बंद करण्यात आली होती. वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात फसली होती. या पूरस्थितीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीने हजर राहत एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका केली. तर कल्याण पश्चिमचे आमदारही गडघाभर पाण्यात भिजून नागरिकांना मदत करत होते.
कल्याणसह भागात पाणीच पाणी झाल्यानंतर कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पाटील यांनीही चक्क सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे पाण्यातून चालताना दिसले. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी ते पाण्यातून मार्ग काढत होते. मुसळधार पावसामुळे कल्याण आणि परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले होते. गोविंदवाडी, एव्हरेस्ट नगर, शहाड, सांगळेवाडी, योगिधाम आणि परिसरात जाऊन आमदार नरेंद्र पवार यांनी नागरिकांना मदत केली. तसेच, सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचंही काम त्यांनी बजावले. अनेकांना अन्न, पाणी आणि इतर गरजेच्या वस्तूही उपलब्ध करून दिल्या. आमदारसाहेबांनी केलेली मदत आणि दिलेला धीर यामुळे नागरिकांमध्येही आत्मविश्वास वाढला. यावेळी, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करत आहोत. पाण्याची पातळी कमी होत आहे. मात्र, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मला 7026023939 या हेल्पलाईनवर कळवा, असे आवाहनही आमदार नरेद्र पवार यांनी परिसरातील नागरिकांना केलं होतं.
दरम्यान, 'आलिशान कारमधून न उतरणे आणि अंगावरील उंची कपड्यांची इस्त्रीही न मोडू देणे हे सध्याच्या लोकप्रतिनिधींचे गुणवैशिष्ट्य आहे. मात्र, नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामातून 'आमदार कसा असावा, तर मतदारसंघातील नागरिकांसाठी भरपावसातही भिजलेला दिसावा', हे त्यांनी दाखवून दिले.