ठाणे : नवीन लेखकांना आपणच ग्रेटच लिहितो असे वाटत असते. त्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. संशोधन करण्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द ही पूर्वीच्या अभ्यासकांपेक्षा आजच्या काळातील अभ्यासकांकडे कमी पडत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुनील कर्णिक यांनी व्यक्त केले.कोमसाप, ठाणे शहर शाखा व जवाहर वाचनालय कळवा याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाचवा वाचकमंच जवाहर वाचनालय कळवा कै. शिवराम पाटील सभागृहात झाला. प्रा. दीपा ठाणेकर यांनी कर्णिक यांची मुलाखत घेतली. यावेळी कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्राबाहेरही मराठी साहित्य विषयक घडामोडी चालू असतात, त्यात मराठी मधील किती साहित्य अनुवादित झाले हे पाहणे फार गरजेचे आहे. तशा प्रकारचे काम मला करायला मिळत आहे त्याचा आनंदच आहे. लेखकांनी कोणत्या काळात काय लिहावे हे आपण ठरवू शकत नाही, त्यांना जे आणि जसे व्यक्त व्हायचे तसे ते होतात. मात्र, वाचन कला, काव्य, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरु चि संपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो, असे त्यांनी सांगितले. कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी प्रास्ताविक केले.यामिनी पानगावकर यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीतील गूढाचा वेध आणि भेद किती परिणामकारकपणे करतेय, हे कुतूहल रसिकांच्या मनात उत्पन्न केले. मीना बर्दापूरकर यांनी गिरीश कुबेर यांच्या ‘एका तेलिया’ने कथेची दमदार सुरु वात केली. आरती कुलकर्णी यांनी भारती मेहता लिखित ‘मन पाखरू’चे अत्यंत मनस्वी विश्लेषण केले आणि कादंबरीतील संस्कारक्षम जग भावले. मयुरी कदम यांनी सुभाष भेंडे लिखित ‘अंधारवाटा’ कादंबरीतील कथेत पात्रांच्या जीवनात होणारी मुल्यांची घसरण व त्यामुळे पुढे येणारा अंधार याचे चित्र रंगविले.वैशाली राजे या शिक्षिकेने सुमती क्षेत्रमाडे लिखित ‘महाश्वेता’ या कादंबरीचे महत्त्व सांगून कोड असलेल्या व्यक्तींना रोगी न समजण्याचा कादंबरीतील संदेश समजावून सांगितला.
नवलेखकांनी लिखाणाचा गांभीर्याने विचार करावा - सुनील कर्णिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:22 AM