लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लाच प्रकरणात ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गांभीर्याने दखल घेत बुधवारी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. काही अपवाद वगळता वरिष्ठ लिपिक आणि लेखापाल यांच्याकडेच प्रभागाची धुरा सोपविण्याचा सिलसिला आयएएस अधिकारी असलेल्या सूर्यवंशी यांनीही कायम ठेवल्याने ‘अदलाबदल करून काय साधले?’ अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी भांगरे आणि मढवी यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यात त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे मनपात आतापर्यंत ३५ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. यात बहुतांश अधिकारी हे प्रभाग अधिकारी आहेत. त्यामुळे सोमवारी भांगरे यांच्या झालेल्या कारवाईनंतर सूर्यवंशी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार साहाय्यक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, साहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे वगळता प्रभागांमध्ये अदलाबदली झालेले सर्वच अधिकारी हे मूळचे वरिष्ठ लिपिक आणि उपलेखापाल आहेत.
‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भांगरे लाचखोरीत पकडले गेल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार गुडधे यांच्याकडे दिला आहे. गुडधे यांच्याकडील ‘ई’ प्रभाग क्षेत्राचा कार्यभार भारत पवार यांच्याकडे तर त्यांच्याकडील ‘ह’ प्रभागाचा कार्यभार सुहास गुप्ते यांना दिला आहे. ‘ड’ प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्याकडे ‘जे’ प्रभागाची जबाबदारी दिली आहे. तर ‘ड’ प्रभागात सुधीर मोकल यांना नेमले आहे. त्यांच्याकडील ‘अ’ प्रभागाची धुरा राजेश सावंत तर ‘फ’ प्रभागाची जबाबदारी भरत पाटील यांच्याकडे दिली आहे. चंद्रकांत जगताप यांच्याकडे ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त स्वरूपात दिला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ग’ प्रभागाचा कार्यभार हाती घेतलेले संदीप रोकडे आणि ‘आय’ प्रभागाचा कार्यभार हाती घेतलेले दीपक शिंदे यांच्याकडील प्रभाग मात्र जैसे थे ठेवले आहेत.
--------------------