भिवंडी: भिवंडी महापालिकेतील सफाई कर्मचारी हप्ते देऊन कामावर गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी मनपा प्रशासनास प्राप्त झाल्याने मनपा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार बुधवारी मनपा प्रभाग २ मधील कॅबिन क्रमांक १२ मध्ये सहाय्यक आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामगारांची तपासणी केली असता तब्बल ११ कामगार गैरहजर असल्याची बाब उघड झाली आहे. या ११ गैरहजर कामगारांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटीसचा २४ तासात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांनी प्रशासनात शिस्त असणे आवश्यक आहे असे सुरवातीपासूनच आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत, कार्यालयीन कमचारी त्याचप्रमाणे आरोग्य कामगार कर्मचारी यांच्या देखील कामाच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत,मात्र आरोग्य कामगार कर्मचारी हे अनेक वेळा कॅबिनवर उपस्थित राहत नाहीत किंवा काम करताना दिसून येत नाहीत, अशा तक्रारी मनपा आयुक्त वैद्य यांच्याकडे येत असल्याने वैद्य यांनी प्रभाग समिती दोनचे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांना याबाबत आरोग्य केबिन तपासण्याच्या आदेश दिले होते.
त्यानुसार सुधीर गुरव यांनी बुधवारी दुपारी प्रभाग समिती दोन अंतर्गत आरोग्य केबिन नंबर १२ येथे भेट दिली असता त्या ठिकाणी ११ कामगार कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या सर्व ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले असून त्यांचा २४ तासात खुलासा मागवण्यात आला आहे. मनपा आयुक्तांनी दिलेल्या या निर्देशाने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.