भिवंडी : केंद्र शासनाने लागू केलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला विरोध करण्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे गुरुवारी आयोजित जाहीर सभा उधळवून लावण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला एमआयएमने मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. ओवेसी यांची सभा पूर्वनियोजित असून, दम असेल तर भाजपने ती रोखून दाखवावी, असे खुले आव्हानच एमआयएमने दिले आहे.ओवेसी यांच्या जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवेसींची जाहीर सभा उधळवून लावू. त्यासाठी भिवंडीतील नाक्यानाक्यांवर भाजपचे कार्यकर्ते तैनात करुन ओवेसींची नाकाबंदी करू, अशी भूमिका भाजपचे शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. भाजपच्या या भूमिकेनंतर एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डु यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. २७ फेब्रुवारी रोजी ओवेसी यांची सभा कोणत्याही परिस्थितीत होईल. दम असेल त्यांनी ती रोखून दाखवावी. सभेसाठी सर्व परवानग्या घेतल्या असल्याचे खालिद गुड्डु यांनी सांगितले. ओवेसींच्या सभेमुळे भाजप आणि एमआयएम आमनेसामने उभे ठाकल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.ओवेसी यांच्या सभेसाठी परवानगी मागणारा विनंती अर्ज एमआयएमच्यावतीने पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सभेला परवानगी द्यावी अथवा नाही, याबाबतचा निर्णय प्रलंबित आणि विचाराधीन आहे. - राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, भिवंडी
दम असेल तर ओवेसींची सभा रोखून दाखवावी; एमआयएमचे भाजपला खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:04 AM