भिवंडी - भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीकडे सध्या प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात अतिक्रमण केले असून शेलार मीठ पाडा नजीकच्या डाईंग साईजिंग कंपन्यांचे केमिकल मिश्रित घातक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने कामवारी नदी प्रदूषित झाली आहे.
शहरातील नदी नाका परिसरात असलेल्या गणेश घाटाच्या चहूबाजूला या नदीवर हिरव्या जलपर्णींचा खच पडला असून दुसऱ्या बाजूला खाडीपात्रात मिळणाऱ्या नदीची पार गटारगंगा बनली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दुरावस्तेकडे स्थानिक महानगरपालिका प्रशासनासह, प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्रामपंचायतींचे व महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून सेवाभावी संस्था देखील या नदीच्या पुनर्जीवनासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नसल्याने कामवारी नदी नदी सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.
भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी या कामवारी नदीचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात उचलून धरला होता. त्यानंतर आमदार रईस शेख यांनी या नदीला अच्यानक भेट देत नदीचे सर्वेक्षण व दुरावस्थेची पाहणी केली होती. आमदारांनी केलेल्या या पाहणी दौऱ्यानंतर मनपा प्रशासनास जाग आल्याने महापालिका प्रशासनाने या नदीवरील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली असून काही भागातील हिरव्या जलपर्णी काढण्यात आल्या आहेत मात्र आजही हे काम अर्धवटच झाले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेसह महापालिकेने नदी स्वच्छतेचा केवळ दिखावा केला आहे. मात्र आजही नदीची परिस्थिती जैसे तेच अशी असून या नदीच्या सुशोभीकरणासाठी व पुनर्जीवनासाठी महापालिका प्रशासनासह शासन विशेष प्रयत्न करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.