ठाणे : न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांसह, वृक्ष अधिकारी आणि वृक्ष समितीला वृक्षतोडीस परवानगी देऊन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुमच्यावर का कारवाई करु नये, असा सवाल करुन नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन नसतांना आणि समिती स्थापन झाल्यानंतरही वृक्ष तोडीला दिलेल्या बेकायदा परवानग्यांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांनादेखील अशा परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या संदर्भात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन नसतांना २०१३ मध्ये ठाणे महापालिकेने सुमारे १०६ वृक्ष तोडीच्या प्रकरणांमध्ये ९६४ आणि १०१६ वृक्ष तोडींना परवानगी दिल्या होत्या. त्यानुसार, विक्रांत तावडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार जो पर्यंत वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन होत नाही, तो पर्यंत कोणत्याही परवानग्या देऊ नये असे सांगितले होते. दरम्यान, फेब्रुवारी २०१५ मध्ये ही स्थगिती उठविण्यात आली. परंतु मधल्या काळात समिती स्थापन झाल्यानंतर आणि वृक्ष तोडीच्या परवानगींना स्थगिती असतांना आॅगस्ट २०१४ मध्ये पाच प्रकरणांमध्ये वृक्ष तोडीच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. या संदर्भात तावडे यांनी पुन्हा डिसेंबर २०१४ मध्ये अवमान याचिका दाखल केली. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता, तत्कालीन वृक्ष अधिकारी दिनेश गावडे आणि वृक्ष समितीला कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तुमच्यावर का कारवाई करु नये असे सांगून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
वृक्षतोडणाऱ्यांना कारणे दाखवा
By admin | Published: August 25, 2015 11:25 PM