भाईंदर - मोदी सरकारने व्यवहारातून अचानक एक हजार व पाचशेच्या चलनी नोटा बाद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केला. त्यावेळी अनेकांना कित्येक महिने दिवसभर बँकेपुढे रांगा लावून आपली आर्थिक चणचण भागवावी लागली. या कालावधीत देशभरातील ८७ लोकांना जीव गमवावा लागला.तत्पूर्वी केंद्र सरकारने नवीन नोटांचे नियोजन करणे आवश्यक असतानाही ते गांभीर्याने घेण्यात आले नाही. परिणामी लोकांना आर्थिक व्यवहारात चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा भासला. अनेकांचे विवाह लांबले तर काहींचे मोडले. यात केवळ सामान्य जनता व लहान व्यापारी भरडले गेले असून, त्याचा फायदा मात्र भाजपाच्या निकटवर्तीय बड्या उद्योजकांना झाला.तसेच लहान उद्योगांवर उदरनिर्वाह करणारे कामगार तसेच शेतकरी या अर्थपुर्ण नोटाबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडले. आजही नोटाबंदीचा फटका सामान्य जनतेला बसत असताना केंद्र सरकारने लहान व्यापारी व सामान्य जनतेवर जीएसटीचे भूत मानगुटीवर बसवले. यामुळे सामान्यांचे आर्थिक ताळेबंद कोलमडले असल्याने त्याचा निषेध नोंदविण्यासाठी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने बुधवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी हजार व पाचशेच्या नोटांना श्राद्ध घालुन आंदोलन छेडण्यात आले. तसेच या नोटाबंदीमुळे जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, पालिका गटनेता जुबेर इनामदार, माजी उपमहापौर नुरजहाँ हुसेन, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, नगरसेविका उमा सपार, सहारा अक्रम, पदाधिकारी अंकुश मालुसरे, प्रकाश नागणे आदींनी सहभाग घेतला होता.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेसचे श्राद्ध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 6:17 PM