ठाणे : ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर तोडगा काढला जात नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून सोमवारी दिव्यांगांनी ठामपाचे श्राद्ध घातले.
भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष आनंद जयराम बनकर , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत - दिव्यांग शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश म. घोरपडे , बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना (रजि) संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान, प्रहार अपंग ( दिव्यांग ) क्रांती संस्था (रजि.)चे ठाणे जिल्हाध्यक्ष - मंगेश मदन साळवी आणि सशक्तिकरण महीला बचत गटाच्या अध्यक्षा शबनम रैन , नितीन जगदाळे , नारायण पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाणे महानगर पालिकेकडून या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टाॅल देण्यात आले आहेत. मात्र, हे स्टाॅल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टाॅल ठेवण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळेच दिव्यांग सक्षमीकरण योजनेस खिळ बसत आहे. मात्र, चुकीच्या ठिकाणी स्टाॅल असल्याने कमाई कमी खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या स्टाॅल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा, अशा ठिकाणी स्टाॅल द्यावेत, किंवा त्यांच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र, पालिका अधिकारी नगरसेवकांची महासभा होत नसल्याने पत्ता बदल करणेस टाळाटाळ करीत आहेत.
वास्तविक पाहता, ठाणे पालिकेतील अधिकारी दरमहा महासभा भरवून धोरणात्मक निर्णय घेत आहेत. तरीही केवळ दिव्यांगांच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जात आहे. त्यामुळेच येत्या दोन ऑक्टोबरला ठामपा मुख्यालयासमोर केशवपन करून ठामपाचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळेस 6 दिव्यांगांनी पितृपक्षात केशवपन केले. तसेच याच ठिकाणी ठामपाच्या नावाने अन्नदान केले. उद्या, तीन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, समितीने सांगितले.
दरम्यान, यावेळी मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूख खान यांनी सांगितले की, दिव्यांगांना व्यवसायासाठी दिलेली जागा बदलून देण्यात यावी, दिव्यांग सक्षमीकरणीकरणासाठी एकरक्कमी पाच लाख रूपये देण्यात यावेत, 80 ते 100 %, अस्थिव्यंग, गतिमंद दिव्यांगांना 5000 रूपये पेन्शन देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ आश्वासने देण्यात आली होती. त्याची पूर्तता करण्यात येत नसल्यानेच आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जो पर्यंत आम्हांस लेखी आश्वासन दिले जात नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात येईल.