ठाणे : तरुण पिढीनेही गझलकडे वळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी शनिवारी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने शनिवारी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या गझलांमधून रसिकांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुणे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नव्या पिढीकडून नवीन विचार ऐकायला मिळत असल्याचे कौतुक करीत आपल्या खास गझल सादर केल्या. पावसाच्या आणि श्रावणाच्या विविध छटा निमंत्रित कवींनी आपल्या कवितेतून सादर केल्या. या संमेलनात दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, विजयराज बोधनकर, रामदास खरे, निकिता भागवत, वृषाली विनायक या कवींनी कवितांचे श्रावणरंग उधळले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचा उद्देश अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांनी विशद केला. ते म्हणाले की, भारतीय भाषांचे स्नेहमिलन करणारी ही संस्था आहे आणि आजच्या तरुण पिढीने सामाजिक संवेदना ओळखून लिहिले पाहिजे. यावेळी महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक राजेश मोरे, आकाशवाणी पुणे वृत्त संचालक नितीन केळकर, मध्य - पश्चिम रेल्वे वित्त अधिकारी सुनील वारे यांची विशेष उपस्थिती होती.