ठाणे : खिडकीबाहेर पडणारा धुंद पाऊस, हातामध्ये वाफाळलेला चहाचा कप आणि नजरेसमोर आपले आवडते पुस्तक. थोडासा निवांत वेळ. अजून काय हवे पामराला ? त्या सुंदर उपक्रमाचे नावच आहे मुळी " श्रावणसरी, चहा आणि पुस्तक.".. हा उपक्रम साकारताना प्राधान्याने पुस्तक संस्कृती जपण्याचे व्रत जपण्याचे आवाहन व्यासने केले आहे. दिवस श्रावणाचे आहेत. श्रावण म्हणजे सृष्टीला पडलेले हिरव्यागार , प्रसन्न अनुभूतीचे जणू सुंदर स्वप्नच. याच तजेलदार श्रावणावर अनेक कवींनी, लेखकांनी आपल्या साहित्यामध्ये भरभरून लिहिले आहे. गीतकारांनी सुंदर गाणी लिहिली आहेत, चित्रकारांनी कॅनव्हासवर श्रावणरंग भरले आहेत तर एखाद्या गवयाने आपल्या गळ्यामधून श्रोत्यांसमोर 'श्रावण' उभा केला आहे. बालकवी, मंगेश पाडगावकर, बोरकर, इंदिरा संत, शांताबाई शेळके, ना. धो. महानोर यांची प्रसन्न गाणी, कविता ऐकल्या की आपण श्रावणामध्ये चिंब भिजून जातो. व्रतवैकल्याचा, सणांचा श्रावण सर्वानाच भावतो. याच श्रावणमहिन्याचे औचित्य साधून ठाण्यातील प्रख्यात व्यास क्रिएशन्स या प्रकाशन संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम जाहीर केला. कितीही प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे येवोत पृथ्वीच्या अंतापर्यंत पुस्तकाचे महत्व अबाधित आहे. पुस्तकाला दुसरा पर्याय नाही. ग्रंथ हेच गुरु आणि एक चांगला मित्र देखील असतो. हा साधा विचार घेऊन व्यास यांनी हा उपक्रम पूर्ण श्रावण महिन्यात राबवण्याचा संकल्प सोडला. उपक्रमाची थोडक्यात ओळख म्हणजे एखाद्या पुस्तक प्रेमी, लेखक-कवीने आपल्या घरी छोटासा कार्यक्रम आयोजित करायचा, मित्रपरिवारांना आमंत्रित करायचे. चहापाण्याची व्यवस्था करायची आणि आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकाचे वाचन करायचे. त्यामध्ये कविता, कथा, लेख, प्रवासवर्णन, स्फुटलेखन सर्व काही असणार आहे. या सुंदर उपक्रमाचा शुभारंभ ठाण्यातील कवयित्री, अभिनेत्री मेघना साने यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. अनेक वाचक रसिकांची गर्दी लाभली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास खरे यांनी केले. वाचनसंस्कृतीचे आणि ग्रंथचळवळीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर व्यासचे संचालक निलेश गायकवाड यांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची पार्श्वभूमी सांगितली आणि व्यास क्रिएशन्सचा प्रकाशन विश्वातला गेल्या चौदा वर्षातला आपला प्रवास उलगडून दाखवला. डॉ. अनुप्रिता नाईक देशपांडे यांनी व्यास क्रिएशन्स यांची आगामी वाटचाल सांगून ग्रंथविषयक विविध उपक्रमांची माहिती सांगितली. त्यानंतर कवयित्री मेघना साने यांनी कार्यक्रमाची सारी सूत्रे हाती घेतली. कार्यक्रमाचा प्रारंभ हेमंत साने यांच्या सुरेल गीताने करण्यात आला. वातावरण तयार होताच उपस्थित असलेल्या लेखक, कवी मंडळींनी आपल्या अभिवाचनाला सुरुवात केली. हातामध्ये वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत कोण कथा, कादंबरीतला अंश, लेख, कविता, पुस्तक परीक्षण सादर करीत होते. कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. शुभारंभाच्या कार्यक्रमास वाचकरसिकांचा असा उत्तम प्रतिसाद लाभला. या अभिनव शुभारंभाच्या कार्यक्रमात नीता माळी, प्रसाद भावे, विकास भावे, विवेक गोविलकर, उदय भिडे, आरती कुलकर्णी, अनंत जोशी, भारती मेहता, स्नेहा आघारकर, स्नेहा वाघ, साधना ठाकूर, संगीता कुलकर्णी, प्रतीक्षा बोर्डे, नितल वढावकर, स्वाती कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमात मेघना साने यांनी ऍडजस्टमेन्ट ही कथा वाचली, आरती कुलकर्णी यांनी आपली कन्या मानसी हिने लिहिलेल्या ब्लॉगचे वाचन केले, नीता माळी यांनी कोसळलेल छप्पर ही कथा वाचली, उदय भिडे यांनी अमीना या नायजेरियन लेखकाच्या इंग्रजी कादंबरीचा केला अनुवाद वाचला, प्रतीक्षा बोर्डे यांनी पाऊस मनातला ही कथा वाचली, भारती मेहता-कथा-वादळ, विवेक गोविलकर यांनी इंडिया एसेज या पुस्तकाचे परीक्षण वाचले, अनंत जोशी-तमाशा-कथा, प्रसाद भावे-पुस्तक ओळख-किती पाकिस्तान, तर दूरदर्शन वृत्तनिवेदिका स्नेहा आघारकर यांनी सुंदर गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी साने दाम्पत्याचा यांचा छोटासा सत्कार व्यास क्रिएशन्सतर्फे करण्यात आला. खिडकीबाहेर कोसळणाऱ्या श्रावण सारी आणि मेघनाताई यांच्या घरामध्ये अलगद विहरणाऱ्या शब्दसरी यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. पुढील कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचे व्यास क्रिएशन्स यांनी ठरवले आहे.
श्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 4:20 PM
व्यास क्रिएशन्सने सुरु केलेल्या श्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात झाली
ठळक मुद्देश्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरवात पक्रमाचा शुभारंभ ठाण्यातील कवयित्री, अभिनेत्री मेघना साने यांच्या निवासस्थानी संपन्नपुढील कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी आयोजित