ठाणे - ठाणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या कोपरी रेल्वेपुलाच्या रु ंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. परंतु या भुमीपुजनाच्या आणि एकूणच या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन आता शिवसेना आणि भाजपात श्रेयाचे राजकारण तापले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर या दोघांनी याबाबत दावा केल्याने श्रेयाचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे. कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम हे मागील १७ वर्षे रखडले होते. या पुलाचे काम सुरु व्हावे यासाठी यापूर्वी पासूनच राजकारण पेटले होते. कधी पालकमंत्री एकनाथ शिंदे तर कधी आमदार संजय केळकर यांच्यात श्रेयाची लढाई सुरु असल्याचे दिसून आले. या पुलाचा सुरवातीला खर्च ९ कोटी होता. परंतु आता त्याच कामासाठी २०० कोटींहून अधिकच खर्च केला जाणार आहे. असे असले तरी या खर्चाच्या मुद्यावरुन भांडण करण्यापेक्षा श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी या पुलाच्या कामाचे भुमीपुजन केले जाणार होते. त्यासाठी सर्वच वृत्तपत्रामंध्ये जाहीराती प्रसिध्द झाल्या. परंतु त्या जाहीरातींमध्ये देखील पालकमंत्र्यांना डावलण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असतांना त्यांनाच डावलण्यात आल्याने सोमवारी कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चा उधाण आले होते.दरम्यान कार्यक्रम सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. परंतु एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांच्या मागे धावत जावे लागल्याचे चित्रही दिसून आले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. परंतु आता या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन शिवसेना भाजपामध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. शहराच्या विविध भागात पालकमंत्री आणि भाजपाच्या आमदारांचे फलक लागले आहेत. यामध्ये दोघांनीही आपल्या परीने श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात या पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आता किती प्रयत्न होतात हे पाहणे महत्वाचे असतांना केवळ आमच्यामुळेच हे काम सुरु झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या दोघांनीही पुलासाठी कशाप्रकारे कोणत्या सालापासून पाठपुरावा सुरु केला याचे प्रमाण देखील लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून दिले आहे. असो कोणाच्याही प्रयत्नाने हे काम सुरु झाले असले तरी ते काम वेळेत पूर्ण व्हावे हीच इच्छा समस्त ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.
कोपरी रेल्वेपुलाच्या भुमीपुजनाचया कामावरुन शिवसेना भाजपात श्रेयाचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:44 PM
कोपरी पुलाचे काम सुरु करण्यासाठी मीच पाठपुरावा केल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यामुळेच भुमीपुजनाच्या निमित्ताने या दोघांमध्ये श्रेयाचे राजकारण तापल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देअखेर कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचा मंगळवार पासून सुरवातशिवसेना, भाजपात रंगला कलगीतुरा