लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामावर १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा अडथळा न आल्यास सर्व कामे मार्गी लावून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला या पुलाचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती केडीएमसीच्या शहर अभियंत्या सपना कोळी यांनी दिली.
कोपर पुलावर सध्या रंगरंगोटी व डांबरीकरणाचे काम सुरू असून तेही अंतिम टप्प्यात आहे. आता फक्त रंग, रोड मार्किंग, सीलकोट टाकण्याचे काम बाकी राहिले आहे. आठवडाभर पावसाने काहीसा दिलासा दिल्यामुळे तेथे डांबरीकरणाचे काम करण्यात आले, असे कोळी म्हणाल्या. सध्या पूर्व-पश्चिम दुतर्फा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना ठाकुर्ली उड्डाणपुलावरून दोन किलोमीटरचा फेरा घ्यावा लागत आहे. मात्र, कोपर पूल सुरू झाल्यावर हा फेरा वाचणार आहे.
नवीन कोपर पूल १० मीटर रुंद करण्यात आला असून, जुना पूल साडेसात मीटर अरुंद होता. हा पूल खुला झाला तर शहरातील वाहतूक रिंग रोड पद्धतीने सुरू होईल आणि ठाकुर्ली परिसरात सध्या होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल.
कोरोना कालावधीत मे २०२० पासून या पुलाच्या कामाने वेग धरला, मार्च ते मे महिन्यात तीन टप्प्यांत तेथे शेकडो टनांचे २१ गर्डर टाकण्यात आले. आणि दीड वर्षात काम फत्ते होत असल्याचे निदर्शनाला येत आहे.
------------