ठाणे : ठाणे महापालिकेने चार महिन्यांनंतर शनिवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने दिवसभर उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी दुकाने उघडताच नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी केल्याने मुख्य बाजारपेठ गजबजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पोलीस आणि महापालिकेकडून मार्केट परिसरातही नागरिकांनी गर्दी करूनये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतर ठिकाणचे मार्केटही बंद होते. अनलॉक जाहीर झाल्यानंतर सम आणि विषम तारखांनुसार दुकाने उघडली जात होती. परंतु, मुंबईत ५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर ठाणे शहरातही अशा पद्धतीने दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे लावून धरली होती. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दुकाने उघडण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार, शनिवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने खुली झाली आहेत.दरम्यान, आठवडाभरावर गणेशोत्सव आल्याने बाजारपेठ खुली होताच शनिवारी सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. दुकानदारांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते.प्रत्येक ग्राहकास सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले होते. परंतु, नागरिकांनी जास्त गर्दी करूनये, यासाठी पोलीस आणि ठाणे महापालिकेकडून खरबदारीच्या सूचना दिल्या जात होत्या.>पालकमंत्र्यांनी दिल्या सूचनाशहरातील सर्वच मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये तसेच मास्कचा वापर करावा, यासाठी जाहीर घोषणा करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तडॉ. विपिन शर्मा यांनी मनपा हद्दीत सर्व प्रभाग समितीअंतर्गत जाहीर घोषणा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार, शनिवारपासून मनपाच्या सर्व प्रभाग समित्यांतर्गत जाहीर घोषणा देण्याची कार्यवाही सुरू झाली. सकाळी आणि दुपारनंतर सायंकाळपर्यंत दोन सत्रांत जाहीर घोषणा करण्यात येणार आहेत.
व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’, मुख्य बाजारपेठ चार महिन्यांनंतर गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:25 AM