ठाणे – लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाण्यातील कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. जळालेली झाडे आणि राखेची भेट मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांना देत याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याची, तसेच झाडे जाळणाऱ्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करण्याची जोरदार मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.खा. डॉ. शिंदे आणि शिवसैनिकांचा रुद्रावतार बघून कदम यांनी बदलापूरचे आरएफओ चंद्रकांत शेळके यांना तातडीने निलंबित केले असून उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांची आठवडाभरात चौकशी करून शासनाला अहवाल पाठवण्याचे मान्य केले. तसे लेखी पत्रच कदम यांनी दिले आहे. तसेच, जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचेही त्यांनी मान्य केले असून मांगरुळ येथे झाडांना आग लावणाऱ्या समाजकंटकांविरोधात वन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचेही मान्य केले आहे. आंदोलनानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.खा. डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेऊन ५ जुलै २०१७ रोजी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एकाच दिवसात एक लाख झाडे लावण्याचे अभियान राबवले होते. तब्बल १५ हजारहून अधिक लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावली होती. या झाडांचे संगोपन उत्तम प्रकारे व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी स्वखर्चाने येथे पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइनची सोय करून दिली होती. तसेच, गेल्या वर्षी माणसे नेमून गवतही कापले होते. या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागाने घ्यावी, तेथे वेळोवेळी गवत कापावे, संरक्षक भिंत बांधावी, वनविभागाची चौकी बांधून कायमस्वरुपी सुरक्षरक्षक नेमावा, यासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. ही सर्व कामे करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी सातत्याने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी कुठलीही पावले उचलली नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही खा. डॉ. शिंदे यांनी या मुद्द्यांकडे अनेकदा लक्ष वेधले होते.
वनविभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी आणि गेल्या आठवड्यात पुन्हा १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी समाजकंटकांनी ही झाडे जाळल्याचा प्रकार घडला. गेल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या आगीत तर ७० टक्क्या्ंहून अधिक झाडे जळाली आहेत. मात्र, त्यानंतरही वनविभागाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतलेला नसून समाजकंटकांना अटक व्हावी, यासाठी कोणतीही पावले उचलेली नाहीत, तसेच बेजबाबदारीने वागलेल्या वन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई देखील केली नाही.
त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी खा. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. जळालेली झाडे आणि राखेची भेट मुख्य वनसंरक्षकांना देत तातडीने कारवाईची मागणी केली. १५ हजार लोकांनी ही झाडे लावण्यासाठी मेहनत घेतली. स्वखर्चाने आम्ही या झाडांचे संगोपन केले; मात्र, वनविभागाला याची किंमत नसून स्थानिक भूमाफिया आणि वीटभट्टीवाल्यांशी वन अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. झाडे मोठी होऊन जंगल झाले तर वीटभट्टीसाठी माती मिळणार नाही, जागेवर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणूनच वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकार केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरकार झाडे लावण्यासाठीच्या इव्हेंटवर आणि त्यांच्या प्रसिद्धीवर जितका खर्च करते, तो खर्च झाडे जगवण्यावर केला असता तर आतापर्यंत महाराष्ट्र हिरवागार झाला असता, अशी टीका देखील यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी केली.
याची गंभीर दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी बदलापुरचे आरएफओ शेळके यांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश दिले. उपमुख्य वनसंरक्षक रामगावकर यांच्या निलंबनाचा अधिकार मला नाही, परंतु आठवड्याभरात त्यांची चौकशी करून अहवाल शासनाला पाठवला जाईल, तसेच जळालेल्या झाडांच्या जागी नवी झाडे लावून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन केले जाईल आणि समाजकंटकांवर वन कायद्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे लेखी पत्र कदम यांनी खा. डॉ. शिंदे यांना दिले.