कल्याण : लोकसभा कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे यंदा तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी झाले. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दोन लाख ५० हजार ७४९ मताधिक्य मिळाले होते. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदाचे मताधिक्य ९३ हजार ५९४ मतांनी वाढले आहे.
कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत सेनेचे शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात रंगली. शिंदे यांनी पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. शिंदे यांना पाच लाख ५९ हजार ७२३ मते (६२.९ टक्के) मिळाली आहेत, तर पाटील यांना दोन लाख १५ हजार ३८० मते (२४.२ टक्के) मिळाली.
तिसºया क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना मिळाली. प्रथमच निवडणूक लढवणाºया वंचित आघाडीने ६५ हजार ५७२ मतांपर्यंत मजल मारली. त्यांना एकूण मतांपैकी ७.४ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव निकालावर पडला नसल्याचे पाहायला मिळते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे हे नवखे होते. त्यावेळी त्यांना चार लाख ४० हजार ८९२ मते मिळाली होती. तर, त्यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी एक लाख ९० हजार १४३ मते पटकावली होती. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादीला २५ हजार २३७ मते अधिक मिळाली आहेत.
दरम्यान, मागील वेळेस टपालाद्वारे एकूण ५९८ मते मिळाली होती. त्यापैकी शिंदे यांना ३१८, तर आनंद परांजपे यांना १३७ टपालाद्वारे मते मिळाली होती. यंदा श्रीकांत शिंदे यांना १७०० टपाली मते, तर बाबाजी पाटील यांना ३६६ टपाली मते मिळाली आहेत.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचेच प्राबल्यराष्ट्रवादीचा बालेकि ल्ला असलेल्या मुंब्रा-कळव्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली आहेत. तर, सेनेच्या शिंदेंना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीला नऊ हजार ८८१ चे मताधिक्य मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांनाही येथे पाच हजार २१० इतकी मते मिळाली आहेत.‘नोटा’ चिंतेची बाब२०१४ मध्ये नोटा मतांची संख्या नऊ हजार १८५ इतकी होती. यंदा मात्र ही संख्या १३ हजार १२ पर्यंत गेली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या तीन हजार ८२७ ने वाढली आहे. ही राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.कल्याण ग्रामीणमध्ये सेनेची बाजी२०१४ च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना १२ हजार २५६ मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, यंदाचे उमेदवार पाटील यांनी भूमिपुत्र म्हणून आगरीकार्डचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्यामुळे त्यांना कल्याण ग्रामीणमधून भरभरून मते मिळतील, असा अंदाज होता. परंतु, तो फोल ठरला आहे. तेथे त्यांना ४३ हजार ८६९ मते मिळाली, तर सेनेच्या शिंदेंनी येथून एक लाख २६ हजार ६०७ मते पटकावली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कल्याण ग्रामीणमध्येच सर्वाधिक मते शिंदे यांना मिळाली आहेत.