ठाणे - श्रीरंग एज्युकेशन सोसायटी, मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा 2020 या विज्ञानप्रदर्शनाचे आयोजन 17, 18 आणि 19 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी उर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक आणि तांत्रिक कल्पकता वाढावी हा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.सदर विज्ञान प्रदर्शनांतर्गत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, विज्ञान प्रश्नमंजुषा, पक्ष्यांचा आवाज ओळखणे, वृक्षांचे प्रकार ओळखणे, छायाचित्रण, पोस्टर बनवणे, टाकाऊपासून टिकाऊ, चर्चासत्र, लघुपट आदि स्पर्धा संपन्न होणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत श्रीरंग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद बललळ यांनी दिली.
पत्रकार परिषदेला खजिनदार महेश भोसले, सहसचिव दिपा खोपकर, सदस्य अरुंधती लिमया, विद्यान परिषदेचे नामदेव मांडगे, मुख्याध्यापिका वंदना पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांसाठी पहिले बक्षीस रु. 2 हजार 500, प्रशस्तीपत्रक आणि चषक, दुसरे बक्षीस रु. 1 हजार 500, प्रशस्तीपत्रक आणि चषक तसेच तिसरे बक्षीस रु. 1 हजार प्रशस्तीपत्रक आणि चषक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त उत्कृष्ट प्रयोगास प्रशस्तीपत्रक आणि चषक आणि प्रत्येक विभागानुसार तीन चषक देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सदर स्पर्धेत उत्कृष्ट शाळेचा विशेष चषकही वितरित करण्यात येणार आहे. उर्जा 2020 विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी शुक्रवार 17 जानेवारी, 2020 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत वृक्ष प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे श्रीरंग महाविद्यालयाच्या मैदानात प्रदर्शन भरवले जाणार आहे. याचसोबत श्रीरंग विद्यालयाचे विद्यार्थी सिंधुदुर्ग किल्ला बनवणार आहेत. तसेच या दिवशी विद्यालयाच्या मैदानात खारफुटीबद्दल विस्तृत माहिती देणारे सदर संपन्न होणार असून सायंकाळी 6 वाजता खारफुटीचे पर्यावरण शास्त्र या विषयावर डॉ. संजय देशमुख यांच्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱया दिवशी शनिवार 18 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10 ते रात्रौ 8 या कालावधीत आयोजित कार्यक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे शहराचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते संस्थेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात संपन्न होणार असून यामध्ये 55 शाळांचा सहभाग असणर आहे. दुपारी 2 वाजता श्री. तारे हे मधमाशांचे आपल्या आयुष्यात आणि पर्यावरणात असलेले महत्त्व या विषयावरील उपयुक्त माहिती देणार आहेत. तिसऱया व शेवटच्या दिवशी रविवार दिनांक 19 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत बक्षीस वितरण कार्यक्रम तळमजल्यावरील ग्रिल हॉल या ठिकाणी संपन्न होऊन महोत्सवाची सांगता होईल.