ठाणे : महिनाभरापूर्वी डान्स बार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळून, कर्तव्यात कसूर केल्यामुळे नौपाडा आणि वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता नौपाडा वगळता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली, तर त्यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर आता वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे.
ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना हिललाईन पोलीस ठाण्यात संधी दिली आहे, तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्यावर पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपविली असून, वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा निकम यांच्याकडे सोपविली आहे. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात, तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे.
घाटेकर यांना औटघटकेची संधी
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना डान्स बार प्रकरणावरून निलंबित केल्यानंतर, त्याच पोलीस ठाण्याचे प्रशासन सांभाळणारे निरीक्षक संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती. परंतु, आता त्याठिकाणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या निकम यांची नियुक्ती केल्यामुळे घाटेकर यांचा कार्यकाळ औटघटकेचा ठरला आहे.