ठाणे: साडेतीन मुहुर्तांपैकांपैकी शुभ मुहुर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्यादिवशी ठाणे जिल्ह्यातील २७ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. अनोख्या मुहुर्तावर विवाह बंधनात अडकण्यासाठी विवाह इच्छुक जोडपी उत्सुक असतात. त्यामुळे व्हॅलेण्टाईन डे असो किंवा एखादी अनोखी तारिख या दिवशी अनेक विवाह इच्छुक जोडपी विवाहबद्ध होतात. विशेष असा दिवस आला की या दिवसाचे औचित्य साधत अनेक जोडप्यांमध्ये विवाहबंधनात अडकण्याची वेगळीच उत्सुकता असते. व्हॅलेण्टाईन डे च्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अनेक विवाह इच्छुक जोडप्यांमध्ये जशी क्रेझ दिसून येते त्याचप्रमाणे अनेक जोडपी अक्षय्य तृतीयेचा देखील मुहुर्त साधतात. यावर्षी व्हॅलेण्टाईन डे च्यादिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे अनेक विवाह इच्छुक जोडप्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे अनेकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहुर्त साधला व या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकणे पसंद केले. सोमवारी तब्बल २७ जोडपी विवाह बंधनात अडकली. गतवर्षीपेक्षा यंदाचा आकडा निश्चितच अधिक असल्याची माहिती विवाह अधिकारी भारत जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एरव्ही जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात १० ते १५ जोडपी विवाहाच्या बंधनात अकडतात. अनोख्या मुहुर्तावर हा आकडा अधिक असतो अशीही माहिती त्यांनी दिली. अक्षय्य तृतीया दिनाला विशेष महत्त्व असते. या दिनाच्या निमित्ताने अनेक जण सोने - चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत असतात, काही आपल्या नव्या वास्तू, वाहने खरेदी करत हा दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. दुसरीकडे या दिवशी विवाह मुहुर्त देखील साधतात. (प्रतिनिधी)
अक्षयतृतीयेनिमित्त २७ जोडप्यांचे शुभमंगल
By admin | Published: May 10, 2016 1:55 AM