लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी येथील हातरिक्षा चालकांचा लढा सुरूच आहे. मध्यंतरी ई-रिक्षा सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाल्याने हातरिक्षा चालकांना यातून आपली सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, अद्यापही सेवा सुरू होत नसल्याने त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सेवा बंद ठेवली होती.
हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता.
हातरिक्षा चालक संघटना माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी व हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी यासाठी लढा देत आहे. त्याच्या लढ्याला यश येत सर्वाेच्च न्यायालयाने प्रायाेगिक तत्त्वावर ई रिक्षाला परवानगी देत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश संनियंत्रण समितीला दिले होत.
संनियंत्रण समितीने सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखत तत्काळ ई रिक्षाचा अहवाल कोर्टाला सादर करावा. एप्रिल महिन्याची मुदत दिली होती, ती संपून सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. - रुपेश गायकवाड, रिक्षा चालक
आम्ही दस्तुरी येथे आमच्या गाडीतून उतरल्यावर आम्हाला कुठेही रिक्षावाले दिसले नाहीत. संप सुरू आहे याची कल्पना नव्हती. अमन लॉज रेल्वे स्टेशनपर्यंत पायी चालत जावे लागले. मी वयस्कर असल्याने तिथून हळूहळू चालत हॉटेल गाठावे लागले. यात खूपच दमछाक झाली.- प्रज्योत त्रिभुवनदास, पर्यटक गुजरात
संतप्त चालकांनी सरकारचे वेधले लक्षत्यानुसार ई रिक्षांचा तीन महिन्यांचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, संनियंत्रण समितीने अद्याप आपला अहवाल सादर न केल्याने ई रिक्षा सुरू होत नाहीत. या ई रिक्षा हातरिक्षा चालकांना चालवायला देण्यात येणार आहेत. मात्र त्या सुरू होत नसल्याने हातरिक्षा चालकांत संताप आहे. त्यांनी सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातरिक्षा सेवा बंद ठेवली होती. यामुळे माथेरानमध्ये आलेल्या अबालवृद्ध पर्यटकांना सेवा न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली.