ठाणे - ईडीकडून ठाकरे सरकार मधील नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शुक्रवारी ठाकरे सरकारमधील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर एन ए सी एल गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ११ कोटी ३५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील हिरानंदानी येथील दोन फ्लॅट तसेच मीरा रोड येथील जमीन यावर कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे. प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांचे ईडीकडून या आधी चौकशी केली गेली होती त्यानंतर आज अशा प्रकारची कारवाई ईडीकडून केली गेली आहे.
घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात रोडास गृहसंकुलातील बॅसीलेस या इमारतीत त्यांचे दोन फ्लॅट असल्याची माहिती पुढे आली आहे. हेच फ्लॅट जत्प करण्यात आल्याची माहिती मुंबईत सरनाईक यांनी स्वत: दिली आहे. त्यानुसार या ठिकाणची पाहणी केली असता, त्याठिकाणी इमारतीच्या खाली शुकशुकाट असल्याचे दिसून आले. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पोलीस अथवा ईडीच्या गाडय़ांचा ताफा दिसून आला नाही.
किंबहुना येथील रहिवाशांना देखील याची माहिती नव्हती की नेमके काय घडले आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर २०२० मध्ये देखील अशाच प्रकार सरनाईक यांच्या या इमारतीमधील फ्लॅटमध्ये त्यांच्या कुटुंबियांची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मोठय़ा मुलाला देखील ईडीने चौकशीसाठी नेले होते. आता दोन वर्षानंतर पुन्हा येथील फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. परंतु त्यांचे फ्लॅट नेमके कितव्या मजल्यावर आहेत, याची माहिती होऊ शकली नाही. किंबहुना त्याठिकाणी जाण्यासही मज्जव करण्यात आला होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे फ्लॅट हे २४ आणि २७ व्या मजल्यावर असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अधिकृत काही माहिती मिळू शकली नाही.