म्हारळ : कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. पालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी केली असून शहाड परिसरात किराणा दुकाने आणि मेडिकल वगळता जवळपास सर्वच दुकाने बंद होती. तसेच वखारी, मार्बलची दुकाने बंद होती. परिणामी, रस्त्यावर, शहाड रेल्वेस्टेशन परिसरात तुरळक गर्दी होती.
कल्याण-डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोनाच्या आकड्यांमुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. ही वाढ रोखण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या पाहावयास मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, भाजी मार्केट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह हॉटेल-बार आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.