लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात `ब्रेक द चेन`च्या तिसऱ्या स्तरातील निर्बंध सोमवारपासून लागू होणार आहेत. यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने खुली राहतील. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहत होती. याबाबतचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले.
जिल्ह्यातील ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल झाले होते. दुकाने रात्री नऊपर्यंत खुली राहत होती, हॉटेलात रात्री ११ वाजेपर्यंत जाता येत होते. मात्र आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही तिन्ही शहरे पुन्हा तिसऱ्या स्तरात समाविष्ट केल्याने येथील नागरिकांवरील निर्बंध कडक झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील सर्व व्यवहार सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. त्यानंतर लोकांच्या फिरण्यावर बंधने आली आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेले मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह पुन्हा बंद राहतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणे क्षमतेच्या ५० टक्के सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत बाहेर फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खासगी व सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेसह चार वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभास हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्के लोक हजर राहू शकतील.
...........
वाचली