ठाणे : ‘श्यामच्या आई’च्या संस्कारांवर आतापर्यंतच्या सर्व पिढ्या घडल्या, तेच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आज गरज आहे. यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा मुंबई आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि अत्रे कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कट्ट्यावर ‘आजचा श्याम घडताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. आजच्या सामाजिक जीवनात माणसांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचे जगणे समजून घ्यायला पाहिजे. यासाठी अनेक चळवळी महाराष्ट्रात काम करताना दिसतात. यात व्यास क्रिएशन्स आणि अत्रे कट्टा यांचे मोठे योगदान आहे. अशा संस्थांमुळे आणि त्यांच्या कार्यामुळे काम करण्याला हुरूप येतो. श्यामची आई पुस्तकाने एक इतिहास घडवला, तो काळही आता सरला. परंतु, श्यामच्या आईच्या संस्कारांना आणि तिच्या गोष्टींना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज दीक्षित यांनी अधोरेखित केली. संस्थेचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आणि कट्ट्याच्या सदस्या स्मिता पोंक्षे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. चर्चासत्रात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
‘श्यामची आई’ समाजमनात रुजावी
By admin | Published: April 26, 2017 11:57 PM