लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा सामना करीत असताना अनेकांना त्यांचे प्रमाण गमवावे लागत होते. कोरोनासाठी ठोस उपचार नसल्याने लस आल्याने आता सुटकेचा निश्वास टाकला असताना दुसऱ्या लाटेत रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेले स्टेरॉईड आणि इंजेक्शनमुळे साईड इफेक्ट समोर येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस या भयंकर आजाराचा सामना करावा लागत आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा उपचाराचा खर्च हा खर्चिक आहे. शिवाय म्युकरमायकोसिसवरील उपचार हा डॉक्टरांकरिता आव्हानात्मक आहे. या आजारात रुग्णाला डोळे गमाविण्याची वेळ येते. प्रसंगी जीवही गमवावा लागतो.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत म्युकरमायकोसिसने आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्टेराॅईड दिले जाते. त्यामुळे सगळ्य़ात जास्त शॉर्ट टर्ममध्ये म्युकरमायकोसिसचा आजार बळावत आहे. तर लाँग टर्म इफेक्टमध्ये रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. परिमाणी लाँग टर्म इफेक्ट रुग्णाला तीन महिन्यात क्षयरोग होण्याची दाट शक्यता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा साईड इफेक्ट नाही. मात्र, टोझलिझूमॅब इंजेक्शनचा साईट इफेक्ट आहे. त्याच्या वापरामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, असे डॉक्टरांचे मत आहे.
----------------
रेमडेसिविरचे साईट इफेक्ट
रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना रुग्णाला दिले जाते. मात्र, त्याचे साईड इफेक्ट काही नाही. त्याचा म्युकरमायकोसिस आजाराशी काही संबंध नाही. हे इंजेक्शन ॲण्टी व्हायरल आहे. रोग प्रतिकारकशक्तीवर त्याचा काही परिणाम होत नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेपूर्वी पहिल्या आठवड्याय़ात दहा डोस दिले जात होते. आता पहिल्या आठवड्यात रुग्णाला सहा डोस दिले जातात. सहा डोस दिल्याने रुग्णाला फायदा होतो; मात्र जास्त डोस दिल्याने नुकसानपण नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रेमडेसिविर हे स्टेरॉईड नाही.
------------------
स्टेरॉईडचे साईड इफेक्ट
स्टेरॉईडचा जास्त वापर केल्यावर म्युकरमायकोसिस आजार होतो. स्टेरॉईडचा जास्त वापर कोरोना रुग्णांसाठी केल्यास त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिसचा आजार बळावत आहे. त्यात काहींना डोळा गमाविण्याची वेळ येत आहे. तर काही रुग्णांना जीव गमाविण्याची वेळ आली आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर टोझलिझूमॅब इंजेक्शनचा जास्त वापर केल्याने रोकप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
------------------
काय होतात परिमाण
स्टेराॅईडचा शॉर्ट टर्म इफेक्ट हा म्युकरमायकोसिसचा आजार आहे. तर लाँग टर्ममध्ये दोन-तीन महिन्यांनी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने त्यांना क्षयरोग होण्याचा धोका संभवतो. भारतात क्षयरोगाचे रुग्ण जास्त आहेत. देशात क्षयरोग निर्मूलनाची मोहिमही सुरू आहे. स्टेरॉईडच्या जास्त वापरामुळे रुग्णांमध्ये लाँग टर्म इफेक्टमध्ये क्षयरोग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतात क्षयरोगाचे रुग्ण पुन्हा रिॲक्टिव्हेट होऊ शकतात.
----------------
काय काळजी घ्यावी
१.कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आल्यास रुग्णाने तातडीने नाक, कान आणि घसा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. वेळेच उपचाराला सुरुवात केली पाहिजे. तर रुग्णाचा जीव वाचू शकतो.
-डॉ. विक्रम जैन
.....
२. डॉक्टरांनी स्टेरॉईडचा योग्य आणि गरजेपुरता प्रमाणित वापर केला पाहिजे. रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे आवश्यक आहे. तरच स्टेरॉईडच्या वापरानंतर साईड इफेक्ट होणार नाहीत.
-डॉ. प्रशांत पाटील
----------------