लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुस्तकांनी सजवलेली पालखी, सावळ्या विठ्ठल रखुमाईच्या वेशातील बालगोपाल, विविध विचारांचा संदेश देणारे फलक, ताळ, मृदुंग, लेझीम,लाठी काठी प्रात्यक्षिक करत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी दिंडी काढत पंढरीच्या विठ्ठलाला आळवले.
सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध सण-उत्सवांचा परिचय करून देत त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असतो. शाळेत प्रत्येक सण-उत्सवांना विचार आणि कृतीची जोड देत उत्सव साजरे केले जातात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशाच विचारांची पालखी खांद्यावर घेत मुलांनी दिंडी काढली. वृक्ष संवर्धन, सुविचारांचे जोपासन, आत्पातकालीन व्यवस्थापनेत असलेल्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना मानवंदना अशा विषयांचा संदेश देत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल सायन्ना मंदिर अशी दिंडी काढली.
दिंडीत पुस्तकांची पालखी, सुविचारांचे तुळशी वृंदावन, विविधांगी विचारांचे फलक, घेत टाळ-मृदुंग, लेझीमच्या गजरात ही दिंडी निघाली होती. विठ्ठल सायन्ना मंदिरात दिंडीचा समारोप झाला व तेथे मुलांनी भजन-किर्तन करत पांडुरंगाच्या रचणी आपली भक्ती अर्पण केली.