डोंबिवली- प्रख्यात चित्रकार प्रल्हाद ठक यांनी रक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीत आनंद बालभवन येथे भरवण्यात आले असून त्यासाठी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विद्यानिकेत शाळेचे संस्थापक विवेक पंडित, ठक यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी शनिवारी झालेल्या शुभारंभाला उपस्थित होते.
बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेतली असून त्यामुळेच माझे योगदान असल्याचे ठक म्हणाले. स्वातंत्र्यविरांचे बलिदान हे खूप महत्वाचे असते. त्यातून त्यागाची भावना प्रेरित होते, ते खूप महत्वाचे आहे. बाबानी आनंदवनात प्रचंड कार्य केले आहे. ते वाखाणण्याजोगे आहे, त्याला मोल नाही. बाबांमुळेच मी घडलो जे काही आहे ते त्यांचे आहे असे मत ठक यांनी व्यक्त केले. ठक यांची बलिदानाची चित्रे डिजिटलायझेशन करून सर्व शाळेत प्रदर्शन म्हणून लावायला हवीत, विद्यार्थ्यांमध्ये त्याग, बलिदान वृत्ती वाढीस लागणे खूप महत्वाचे आहे. विद्यानिकेतन शाळेत ही प्रदर्शनी नक्की लागेल, आम्ही लावूच पण अन्य शाळांत लागावी असे प्रयत्न पालकमंत्री चव्हाण यांनी करावेत असे आवाहन पंडित यांनी केले. तर अशी प्रदर्शन ठिकठिकाणी भरवण्यात यावीत यासाठी नक्की प्रयत्न केले जातील, डोंबिवलीत त्याचा शुभारंभ झाला आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे, माझे सर्वतोपरी सहकार्य या उपक्रमात राज्यभर असेल असे प्रतिपादन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले. त्यावेळी विविध शाळांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.