अंबरनाथ - बदलापूरच्या कात्रप डोंगरावर आदिवासी बांधवांना बिबट्याचे दर्शन घडले होते. बिबट्याचा वावर बदलापूर मध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण बदलापुरात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं होते. आता हा बिबट्या वसद आणि जांभूळ गावाच्या हद्दीमध्ये दिसला असून शेतकऱ्याने त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
गेल्या आठवड्यात बदलापूरच्या कात्रप डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले होते. त्या बिबट्याचे पायाचे ठसे देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. या घटनेनंतर अवघ्या चार दिवसानंतर बदलापूर गावात देखील बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्याठिकाणी बिबट्या होता की नव्हता याबाबत कोणताही पुरावा सापडला नाही. बदलापूर गावातील बिबट्याचे दर्शन अफवा असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता शनिवारी रात्री आठ वाजता वसद आणि जांभूळ या दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा वावर एका नागरिकाला दिसला. त्याने लागलीच त्याची माहिती ग्रामस्थांना आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
गावात बिबट्या आल्याची चर्चा रंगताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला ही अफवा असल्याचीच शक्यता होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या ज्या मार्गाने गेला त्या ठिकाणी पायाचे ठसे तपासले असता बिबट्याच्या पायाचे स्पष्ट ठसे सापडले आहेत. त्यामुळे सध्या बिबट्याचा वावर हा वसद आणि जांभूळ परिसरातील डोंगरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे हा बिबट्या पुन्हा बदलापूर शहराच्या दिशेने किंवा अंबरनाथ शहराच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्फत करण्यात आले आहे.