ठाणे : एका व्यावसायिकाच्या वडिलांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेला मारहाणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी २० हजारांची खंडणी उकळणाऱ्या सिकंदर बदरूदजा खान, (वय ३०, रा. आंबेवाडी, इंदिरानगर, ठाणे) या आरोपीला दीड वर्षानी जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी शुक्रवारी दिली. त्याला वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सिकंदरविरुद्ध २०२२ मध्ये वर्तकनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देता होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी खंडणी विरोधी पथकाला दिले होते. वर्तकनगर भागातील व्यापारी आफताफ खान याच्या वडिलांविरुद्ध दीड वर्षापूर्वी सिकंदर याने हाणामारीचा गुन्हा वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केला होता. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी सिकंदर याने आफताफ यांच्याकडे ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये त्याने त्यांच्याकडून घेतले होते. उर्वरित ३० हजारांचा तगादा त्याने त्यांच्याकडे लावला होता.
त्याच दरम्यान, आफताफ यांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी सिकंदर हा भिवंडीतील खाडीपार, ब्राह्मण आळी या भागात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. त्याच आधारे सहायक पोलिस निरीक्षक भूषण कापडणीस यांच्या पथकाने भिवंडीतील खाडीपार निजामपुरा भागातून त्याला ३१ जानेवारीला ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुलीही दिली. पुढील कारवाईसाठी त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.