कल्याण : लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील वाद काही कमी होताना दिसत नाही. यावर गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या जिल्हानिहाय बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडून झाडाझडती घेतली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी या वादावर मौन बाळगून आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली आणि उपस्थितांची मते जाणून घेतली.
पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वक्त्यांसमोेरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला होता. अंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. या घटनेतूनही वादाचा सिलसिला सुरूच असल्याचे समोर आले होते. या वादाचे पडसाद पवारांनी बोलाविलेल्या जिल्हानिहाय बैठकीत उमटतील, अशी चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या या बैठकीत पवार वादाची गांभीर्याने दखल घेतील का, याकडे लक्ष लागले होते; परंतु प्रत्यक्षात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत या वादावर मौन बाळगणेच श्रेष्ठींनी पसंत केल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविली असली, तरी पक्षांतर्गत वादाची दखल पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. दरम्यान, या बैठकीत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष पदाऐवजी लोकसभा अध्यक्ष असावा, अशीही सूचना काही पदाधिकाºयांकडून या वेळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कल्याणचा दौरा करणार असून संघटनात्मक बांधणीबरोबरच पक्षांतर्गत वस्तुस्थितीचा आढावा घेतील, असे या वेळी ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन मतदारसंघांची मागणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावेत, अशी मागणी उपस्थित पदाधिकाºयांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.