लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला. मिशन वालधुनी पार पडले. तसेच या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष निधी आणण्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.उल्हासनगरच्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच मिशन वालधुनी हा कार्यक्रम राबविण्यात आला. शहराच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त ६८ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सकाळी साडेसात वाजता उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते चांदीबाई महाविद्यालयादरम्यान वालधुनी नदीकिनारी जलपुरूष राजेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, महापौर मीना आयलानी, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा आदीसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. राजेंद्र सिंग यांनी नदीची पाहणी करून ती वाचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.या पदयात्रेनंतर सर्वांनी ऐतिहासिक कोनशिलेकडे मोर्चा वळविला आाणि तिला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नदी संवर्धनाबाबत दुपारी जलसंवाद झाला. त्यात राजेंद्र सिंग यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शन केले. वालधुनी बिरादरी व रोटरी क्लब यांनी ६८ प्रश्नांच्या प्रश्नावलीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार केला.
‘मिशन वालधुनी’त कारखान्यांच्या प्रदूषणावर मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:06 AM