मीरा रोड : कोरोना संसर्गाच्या संकटात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असताना, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मात्र मापात पाप करून ग्राहकांची लुबाडणूक करत आहेत. कोरोना संसर्ग झपाट्याने पसरून रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिक मास्क न घालता गर्दी करत फिरत असल्याने, कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने पसरत असल्याने फळ - भाजी, किराणा विक्रेत्यांवर निर्बंध आणतानाच घरपोच सेवेवर भर देण्याचा नियम लागू केला आहे.
अनेक ठिकाणी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत तर अनेक ठिकाणी लपून भाजी-फळ विक्रेते व्यवसाय करत आहेत. भाजीवाले तर बंदी असलेल्या प्लास्टीक पिशव्यांमध्येच भाज्या बांधून त्याची विक्री करत आहेत. अशा स्थितीत अनेक विक्रेते हे वजनात पाप करत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. वजनासाठी इलेक्ट्रिक वजन काटा, तसेच वजनमापे विभागाचा शिक्का असलेली वजने विक्रेत्यांनी वापरणे बंधनकारक आहे, परंतु अनेक ठिकाणी वजन काट्यात किंवा वजनात हेराफेरी करून ग्राहकांना फसवले जात आहे.
भाईंदरच्या भावना घरत म्हणाल्या की , भाजी, फळ विक्रेते यांच्याकडून घेतलेल्या वस्तूंचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यास ते कमी असते. असे प्रकार अनेक वेळा होतात, पण सर्वसामान्य गृहिणी प्रत्येक वेळी कुठे वजन तपासत बसणार? त्यामुळे वजनात फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून अशांचे व्यवसाय बंद करायला हवेत.मच्छीमार नेते आणि शिवसेना शहर प्रमुख बर्नड डिमेलो यांनी एका विक्रेत्याने मापात पाप करून लोकांची चालवलेली फसवणूक उघड केली आहे. उत्तन नाकाजवळ खाडीवर बांधलेल्या एका मटणाच्या दुकानात रविवारी डिमेलो हे गेले असता, दुकानदाराने वजनकाट्यावर वजन दाखवून मटण दिले. डिमेलो यांना संशय आल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर पुन्हा वजन करण्यास सांगितले असता, तब्बल १५० ग्राम मटण कमी असल्याचे उघड होताच विक्रेत्याच्या तोंडचे पाणी पळाले.
प्रकार थांबले नाहीत, तर शिवसेना करेल आंदोलनशहरात वजनमापे विभाग झोपा काढत असून, त्यांच्या संगनमतानेच ग्राहकांची लूट सुरू असल्याचा आरोप करत डिमेलो यांनी या घटनेची तक्रार केली आहे. शहरात किराणा विक्रेते आदी सदोष वजनमापे व काटे वापरून कमी वजनाचे सामान देऊन नागरिकांची सर्रास लूट करत आहेत. हे प्रकार थांबले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना आणि फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना धडा शिकवू, असा इशारा डिमेलो यांनी दिला आहे.