उल्हासनगर : स्थायी समिती सभापती कार्यालयाच्या सिंधी भाषा नामफलकावरून मनसे आक्रमक झाली आहे. फलकाची प्रथमदर्शनी बाजू मराठी ठेवण्याची मागणी मनसेने करून नामफलकाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली.
उल्हासनगर महापालिकेतील सिंधी भाषिक नामफलकावरून नेहमी वाद निर्माण होतात, असा पालिकेचा इतिहास आहे. स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी कार्यालयाबाहेर सभापतीपदाच्या नावाचा फलक प्रथमदर्शनी सिंधी तर मागच्याबाजूला मराठी भाषेत लावले आहेत. नामफलकाबाबत शिवसेना वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती झाल्याने, शिवसेनेला उघडपणे बोलता येत नाही.
मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी सिंधी नामफलकावर आक्षेप घेतला. मायमराठी भाषा प्रथमदर्शनी तर मागच्याबाजूला सिंधी भाषेत लिहीण्याला संमती दर्शवली. तसेच प्रथमदर्शनी भागात वरच्या बाजूला मराठी तर खालच्या बाजूला सिंधी भाषेत नामफलक लिहीले तरी आक्षेप नसेल, असे देशमुख म्हणाले. मनसेने हा मुद्द उपस्थित केल्याने शिवसेनेत चुळबूळ सुरू झाली आहे. मात्र उघडपणे कुणीही विरोध करत नसल्याने, हेच का शिवसेनेचे मराठीप्रेम? असा प्रश्न विचारला जात आहे. एका आठवडयात स्थायी समिती सभापती कार्यालया समोरील नामफलक मराठीत झाला नाहीतर मनसे आंदोलन करेल असा इशारा देशमुख यांनी दिला आहे. तसेच नामफलकाला काळे फासण्याचा इशारा दिला.स्थायी समिती सभापती वधारिया यांनी कार्यालयासमोरील नामफलक प्रथमदर्शनी सिंधी भाषेत असलातरी मागच्याबाजूला ठळक मराठी भाषेत नामफलक आहे. मराठी भाषेबाबत आम्हाला आदर असून मायमराठीचा अपमान करणे रक्तात नाही, अशी प्रतिक्रिया दिली.शिवसेनेचाही नामफलकाला विरोधमहापालिका प्रशासनाला सिंधी नामफलकाबाबत जाब यापूर्वीच विचारला आहे. त्यांनी चौकशीनंतर नामफलक बदली करण्याचे आश्वासन दिले होते. महापालिकेतीलच नव्हेतर राज्यातील कोणतेही नामफलक मराठी भाषेतच हवे असा पक्षाचा आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.