- सदानंद नाईकउल्हासनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना व ओमी टीम एकत्र येण्याचे संकेत युतीचे संभाव्य उमेदवार खासदार श्रीकांत शिदे आणि ओमी कलानी यांनी दिल्याने, शहरातील मराठी व सिंधी वाद निकालात निघण्याची चिन्हे आहेत. रविवारी रात्री खासदार श्रीकांत शिंदे व ओमी कलानी यांची बैठक झाली. यावेळी शिवसेनेला साथ देण्यासाठी ओमी कलानी तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.उल्हासनगरात सिंधी व मराठी वाद निर्माण झाल्यानंतर, शिवसेना मराठी तर पप्पू कलानी हे सिंधी समाजाच्या मागे उभे ठाकले होते. शहरातील राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले ओमी कलानी कुटुंब व शिवसेना लोकसभा निवडणुकीनिमित्त एकत्र येणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाप्रमाणे शिवसेना बदल रही है, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील राजकारण गेल्या तीन दशकांपासून कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे. कलानी कुटुंबातील सासूसुनेकडे आमदार व महापौर ही महत्त्वाची पदे असून ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार, तर पंचम कलानी भाजपाच्या महापौर आहेत. ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून भाजपासोबत महाआघाडी केली आणि पालिकेची सत्ता काबीज केली.लोकसभा निवडणुकीत ओमी टीमची मदत घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने सुरुवातीला घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल, तरच शिवसेनेला साथ देणार असल्याची भूमिका ओमी टीमने घेतली होती. दरम्यान, निवडणुकीच्या मुद्यावर श्रीकांत शिंदे यांच्याशी कलानी महलमध्ये रविवारी रात्री बैठक झाली.उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा विसरमहापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेऐवजी ओमी टीमसोबत आघाडी केली. त्यावेळी शहरात लावण्यात आलेल्या अनेक पोस्टर्सवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत माजी आमदार पप्पू कलानी यांचे फोटो होते. या पोस्टर्सवरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना पप्पू कलानी यांच्या रांगेत आणून भाजपाची संस्कृती बदलल्याची टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर शहरातील पोस्टर्स गायब झाले होते. आता लोकसभा निवडणुकीत याच ओमी टीमसमोर शिवसेनेने मदतीचा हात पसरल्याने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा शिवसेनेला विसर पडला की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांसह शिवसैनिकांनाही पडला आहे.
उल्हासनगरात सिंधी - मराठी वाद निकालात निघणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:35 AM