नितिन पंडीतभिवंडी ( दि. ७ ) एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात मागील एक वर्षां पासून खंडणीसह बलात्काराचे खोटे गुन्हे नोंदवून त्यांच्या व पक्षाच्या राजकीय वाटचालीला रोखण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करीत असल्याने सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी भिवंडी येथे शुक्रवारी केली आहे .ते भिवंडीत शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या कुटुंबियां सह कार्यकर्त्यांच्या भेटी साठी आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .या प्रसंगी माजी आमदार वारीस पठाण यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात खंडणी व बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे राजकीय दबाव टाकून वेळोवेळी नोंदवून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत त्यांना जामीन मिळू नये या साठी काम करीत असल्याचा आरोप एमआयएम चे खा.इम्तियाज जलील यांनी करून खालिद गुड्डू याचे राजकीय प्रस्थ शहरात वाढत असल्याने राजकीय पक्षांनी हे षडयंत्र रचले असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची मुंबई येथे भेट घेऊन या सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे .
एमआयएम पक्षाची ताकद शहरात वाढत असून खालिद गुड्डू प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालया समोर पक्ष प्रमुख खासदार ब्यारिस्टर असउद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा देखील खा. इम्तियाज जलील यांनी शेवटी दिला .