ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ टक्के शाळा प्रवेशालादेखील त्याचा फटका बसला आहे. यंदाच्या वर्षीसाठी ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश निश्चित केल्याची बाब समोर आली आहे.
वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे. त्यांनी संबंधित शाळेत जाऊन ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांमधील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ जी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार ८८ अर्जांची निवड झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील शाळा प्रवेशाची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ दोन हजार ५३८ विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश घेतल्याची बाब समोर आली असून, तब्बल सहा हजार ५४८ जणांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले.
- शाळांनी पालकांना संदेश पोहोचवले नाहीत
जिल्ह्यातील अनेक शाळा प्रशासनाकडून निवड झालेल्या पालकांना शाळा प्रवेशाबाबतचे संदेशच न पोहोचल्यामुळे जिल्ह्यात शाळा प्रवेश न झालेल्या अर्जांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
.............
साडेसहा हजार विद्यार्थी ही संख्या खूप मोठी असून, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा प्रवेश न होणे ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गोरगरीब साडेसहा हजार कुटुंबांना याची झळ पोहोचणार आहे. यामुळे आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशाची मुदत वाढवून देऊन या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.