ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या मंजुरीवरून चांगलाच वादंग पेटला आहे. अखेर शहरातील पहिल्या टप्प्यातील सहा यूआरपींना (अर्बन रिन्यूअल प्लॅन) राज्य सरकारने मंगळवारी मंजुरी दिली. किसननगर, कोपरी, राबोडी, हाजुरी, टेकडी बंगला आणि लोकमान्यनगर यांचा त्यात समावेश असून किसननगर क्लस्टर योजनेतील किसननगर-जय भवानीनगर येथील पहिल्या यूआरएसचे (अर्बन रिन्यूअल स्कीम) भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरु वारी होत आहे.
ठाण्यातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो नागरिकांना हक्काचे व सुरक्षित घर मिळावे, यासाठी मागील काही वर्षे गुºहाळ सुरू होते. अखेर या योजनेला मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील क्लस्टर योजनेचे भूमिपूजन करण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते. परंतु, या क्लस्टरला शासनाची किंवा महापालिकेची मंजुरी नसल्याचे उघड झाल्यावर काँग्रेस आणि भाजपसह ठाणे मतदाता जागरण अभियनानेही क्लस्टर विरोधात आवाज उठविला होता.
दरम्यान, नगरविकास खाते माझ्याकडे आहे, त्यामुळे तुमच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण केले जाईल, असे उत्तर सोमवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मंगळवारी महापालिका हद्दीतील या सहा यूआरपींना सरकारने मंगळवारी मंजुरी दिली.
असे आहेत सहा यूआरपी
कोपरी (४५.९०हेक्टर), किसननगर (१३२.३७ हे.), राबोडी (३५.४ हे.), हाजुरी (९.२४ हे.), टेकडी बंगला (४.१७ हे.) आणि लोकमान्यनगर (६०.५१ हे.) असे एकूण २८७.५९ हेक्टर क्षेत्रात हे सहा यूआरपी राबवण्यात येणार आहेत. या सहा यूआरपींमध्ये सुमारे १ लाख ७ हजार बांधकामे असून सुमारे ४ लाख ८५ हजार लाभार्थी आहेत. एकूणच यामुळे आता क्लस्टर योजनेतील महत्वाचा अडथळा दूर झाला असून आता भूमिपूजनातील अडथळेही दूर झाले आहेत.
क्लस्टरसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून काही लोकांकडून गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत. ही योजना कोणत्याही पक्षाची नसून गरीब आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे. ज्यांना या योजनेविषयी संशय असेल त्यांनी प्रशासनाबरोबर बसून गैरसमज दूर करावा, क्लस्टरला लागणाऱ्या सर्व अधिकृत परवानग्या आमच्याकडे आहेत आणि हे भूमिपूजन नियमाप्रमाणेच होत आहे. - संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा