ठाणे : कोरोना कमी होत असला, तरी शहरातील कोविड सेंटर बंद केले जाणार नाहीत, असा दावा महापालिकेने केला होता. परंतु, आता मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आणि काही रुग्णालये रुग्णांअभावी ओस पडू लागल्याने सहा कोविड रुग्णालये अखेर महापालिकेने बंद केली आहेत. यामध्ये पाच खाजगी रुग्णालयांसह महापालिकेच्या ४०० बेडच्या कोविड सेंटरचाही समावेश आहे. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरू केलेले तीन क्वॉरंटाइन सेंटरही बंद केले आहेत.
ऑक्टोबरअखेरपासून शहरातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्णांची संख्या १४७७ असून रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १२५ ते १५० च्या खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ९४ टक्के झाले आहे. विशेष म्हणजे आता लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या दिसत असून त्यामुळे मृत्युदरही खाली आला आहे. असे असले तरी भविष्यात कोरोनाची लाट येऊ शकते, त्यादृष्टीने शहरातील एकही कोविड सेंटर बंद केले जाणार नसल्याचा दावा महापालिकेने काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, आता रुग्णांची संख्याच कमी होत असल्याने खाजगी रुग्णालयांनी नॉन कोविड रुग्णालयासाठी परवानगी मागण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पाच खाजगी रुग्णालयांतील कोविड सेंटर बंद केले आहेत. तसेच महापालिकेने दोन महिन्यांंपूर्वी सुरू केलेले बुश कंपनीमधील ४०० बेडचे कोविड सेंटरही बंद केले आहे.
रुग्णालयांबरोबरच ज्या रुग्णांना कोरोनाची कोणतेही लक्षणे नव्हती, अशा रुग्णांसाठी पालिकेने भाईंदरपाडा आणि होरायझन स्कूलचा पर्याय ठेवला होता. परंतु, आता भाईंदरपाडा येथील ए आणि सी विंगमधील ७०० बेडचे हे सेंटर बंद केले आहे. तर, होरायझन स्कूलमधील २५० बेडचे सेंटरही बंद केले आहे.