टिटवाळा : माॅर्निंग वाॅक करताना भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या राजाराम व्हनकट्टे (७८) यांचा ३१ ऑगस्टला रुग्णालयात मृत्यू झाला हाेता. माेहने वडवली येथे नवीन ब्रिजजवळ हा अपघात झाला हाेता. याप्रकरणी खडकपाडा पाेलीस ठाण्यात त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला हाेता. मात्र, त्यानंतर सहा दिवस उलटूनही पाेलिसांना रिक्षाचालकाला अटक करण्यात अपयश आल्याने, व्हनकट्टे यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मोहने व अंबिवली स्टेशन परिसरात अनेक रिक्षाचालकांकडे परमिट, युनिफॉर्म, बॅच, लायसन्स व अत्यावश्यक वाहतुकीची कागदपत्रे नसतानाही ते बिनधास्त व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर वाहतूक विभाग व आरटीओकडून ठाेस कारवाई हाेत नाही. यात अल्पवयीन मुलेही रिक्षा चालवीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणेही धाेक्याचे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्हनकट्टे यांच्या मृत्यूनंतर हा प्रकार पुन्हा ऐरणीवर आला आहे. रिक्षाचालकाच्या तपासाविषयी खडकपाडा पोलीस ठाण्याचे तपास अंमलदार ज्ञानेश्वर सुरवाडे यांना विचारणा केली असता, त्यांनी रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.