लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाचे ५९३ नवे रुग्ण आढळले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. या मोहिमेत कल्याणच्या डीमार्टमध्ये सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे डीमार्ट पाच दिवसांकरिता सील करण्यात आले आहे.
फेरीवाले, दुकानदारांच्या चाचण्या करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. मध्यंतरी रुग्णांची संख्या कमी झाली होती. तेव्हा महापालिका हद्दीत १ हजार २०० चाचण्या दररोज केल्या जात होत्या. आता रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. मंगळवारी २ हजार ८००, तर बुधवारी ३ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. बुधवारी डीमार्टमधील ११० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने महापालिकेने डीमार्ट पाच दिवसांकरिता सील करून अन्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले आहे. डीमार्टमध्ये दररोज हजारो लोक खरेदीसाठी येतात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचे पालन केले जात नाही. पाॅझिटिव्ह कर्मचाऱ्यांचा अन्य किती जणांशी संपर्क आला आहे, याचा नेमका आकडा महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. त्याला महापालिका अपवाद नाही. लॉकडाऊनच्या भीतीपोटी नागरिकांकडून खरेदीसाठी डीमार्टमध्ये गर्दी केली जात आहे. महापालिकेने ११ मार्चपासून कडक निर्बंध लागू केले. दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही कल्याण डोंबिवलीत फरक पडत नसल्याची बाब डीमार्टच्या प्रकरणावरून समोर आली आहे.
..................
यापूर्वीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी डीमार्टवर कारवाई केली होती. तसेच १० हजार रुपयांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला होता. त्यानंतरही डीमार्टमध्ये सुधारणा आढळून आली नाही. पाच दिवसांनंतर कोरोना नियमावलीचे पूर्ण पालन करून डीमार्ट उघडता येणार आहे.
----------------------------