ठाणे : रेल्वे प्रवासात मोबाइल चोरटे सुसाट असताना त्यांच्यावर वचक बसण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या सराईत मोबाइल चोरट्यांना अखेर ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड यासारख्या पोलीस कार्यक्षेत्रांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. अशा प्रकारे मागील १५ महिन्यांत सहा जणांना तडीपार केले असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.ठाणे रेस्थानकात प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच गर्दीत चोरटे हातचलाखीने मोबाइल लांबवत आहेत. अशा प्रकारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिवसाला साधारणत: पाच गुन्हे दाखल होत आहेत. तसेच मागील वर्षभरात रेल्वे प्रवासात पाच लाख रुपये किमतीचे तीन हजार दोन मोबाइल फोन चोरीला गेले असून याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या आकडेवारीवरून रेल्वे प्रवासात चोरटे डोके वर काढू पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंग, टॉप-२५ यादी यासारख्या उपाययोजना राबवण्यावर विशेष भर दिला आहे. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात वारंवार निदर्शनास येणाऱ्यांविरोधात तडिपारीचे प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे २०१७ मध्ये एकूण १७ मोबाइल चोरट्यांच्या तडिपारीचे प्रस्ताव तयार केले होते. त्यामध्ये चार जणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून त्याही रेकॉर्डवरील आहेत. तसेच, २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांत दोन जणांना तडीपार केले आहे. त्या सर्वांना चार जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केल्यावर संबंधिताला काही एका ठरावीक कालावधीत पकडून वरिष्ठांसमोर हजर करावे लागते. त्यानंतर, तडिपारीची कारवाई केली जाते. मात्र, काही वेळा चोरटे मिळून येत नसल्याने त्यांना हजरही करता येत नाही. त्यातूनच तो प्रस्ताव रद्द होतो. त्यामुळे मोबाइल चोरटे तडीपार होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे सहा जण झाले तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:58 AM