ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कोठारी कम्पाउंडमधील अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर्स, लाउंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण सहा आस्थापना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सोमवारी सील केले. शहरातील जवळपास १० अनधिकृत हॉटेल्सवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले.शनिवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कम्पाउंडचा मुद्दा उपस्थित केला होता. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईचा देखावा करून अभिनंदनाची थाप मिळवण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. पालिकेने कारवाईचा फार्स केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ठाण्यातील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत २८ डिसेंबरला संपली. त्यानंतर कारवाई करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी या आस्थापनांवर सोमवारपासून कारवाईचे संकेत दिले होते.त्यानुसार, कोठारी कम्पाउंडमधील हॉटेल, पब्ज, लाउंज, बार आणि शहरातील ४५८ हॉटेल आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महापालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात सकाळी १० वाजल्यापासून कारवाईस सुरुवात झाली. यामध्ये कोठारी कम्पाउंडमधील ‘एमएच-४ पब आणि बार’, ‘डान्सिंग बॉटल पब’, ‘लाउंज १८’ बार, ‘व्हेअर वुई मेट’, ‘बार इंडेक्स’ हे हुक्का पार्लर्स सील करतानाच या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले.दुसरीकडे नौपाडा प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील कारवाईमध्ये ‘पुरेपूर कोल्हापूर’, ‘साईकृपा’ या हॉटेल्सचे वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले, तर ‘एक्सपिरिअन्स’ हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला. त्याचबरोबर मल्हार सिनेमा येथील ‘दुर्गा बार आणि रेस्टॉरंट’ तसेच जांभळीनाका येथील ‘अरुण पॅलेस बार’ अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने सील करण्यात आले.रामचंद्रनगर येथील ‘जयेश’ हा लेडिज बार पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आला, तर उथळसर येथील ‘फुक्रे’ बारसह इतर ३ रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली.अग्निसुरक्षेच्या मुद्द्यावर पालिकेच्या अटी-शर्तींचे पालन न करणाºया इतर आस्थापनांवरही सध्या पालिकेची नजर आहे.अग्निसुरक्षेच्या अटी जाचक असल्याचा आस्थापनांचा दावा-कमला मिल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ४५८ हॉटेल आस्थापना काही दिवसांपासून कारवाईच्या रडारवर होत्या. आयुक्तांच्या १५ दिवसांच्या मुदतीत शहरातील ५४२ हॉटेल्स आणि बारमालकांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी तयार केलेले अर्ज अग्निशमन विभागाकडून घेतले होते.त्यातील बहुतांश अटी-शर्तींची पूर्तता करत असल्याचा दावा करणाºया १८० आस्थापनांनी अग्निशमन विभागाकडे हे अर्ज सादरही केले होते. मात्र, अग्निशमन अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत यातील एकही हॉटेल हे नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र ठरले नाही.अग्निसुरक्षेच्या अटीशर्ती जाचक असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी विनंती या व्यावसायिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे. त्यावर चर्चासुद्धा सुरू आहे. तोवर मात्र नियमभंग करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात झाली.
सहा हुक्का पार्लर केले सील, ठाणे पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:39 AM