ठाणे: भल्या पहाटे ठाण्याच्या भरवस्तीतील कोरम मॉल आणि सत्कार हॉटेलमध्ये बिबटया शिरल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. ठाणे वन्य जीव विभाग, संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचे पथक आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आदींच्या ७० ते ८० जणांच्या पथकांनी तब्बल सहा ते साडे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ५४ किलो वजनाच्या नर बिबटयाला अनेक अडथळयांचा सामना करीत यशस्वीरित्या जेरबंद केले. त्याला वनविभागाच्या विशेष पिंज-यातून बोरीवली राष्टÑीय उद्यानात सोडण्यात आल्याची माहिती ठाणे वनविभागाने दिली.बुधवारी पहाटे ५.४० वा. च्या मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गाला लागून असलेल्या ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्र्किंगमध्ये बिबटया शिरल्याचे एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्हीमध्येही त्याच्या हालचाली पहायला मिळाल्या. तासाभराने तिथून तो बाहेर पडल्याचेही आणखी एका कर्मचा-याला दिसले. ही माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन केंद्र, वनविभाग आणि वर्तकनगर पोलिसांना मिळाल्यानंतर सर्व विभागाची पथके अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कोरम मॉलमध्ये दाखल झाली. त्याठिकाणी ठाणे वनक्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्यासह विविध पथकांनी सुमारे अर्धा तास शोध मोहीम राबविली. दरम्यान, ६ वाजून ३५ मिनिटांनी बिबटया मॉलच्या संरक्षक भिंती वरून बाहेर गेल्याचे निदर्शनास आले. मॉलच्या मागील भागातील शेतीमध्ये किंवा एखाद्या झुडपामध्ये तो लपल्याची शक्यता व्यक्त होत असतांनाच तिथून अवघ्या अर्धा किलो मीटर अंतरावर असलेल्या सत्कार रेसिडेंसीमध्ये एका कार्यक्रमाचे सामान ठेवण्यासाठी आलेल्या वाहनाच्या चालकाला तो दृष्टीस पडला. त्याने तातडीने हॉटेलच्या प्रशासनाला याची माहिती दिली. तिथेही त्याने बेसमेंटचा मार्ग पत्करुन थेट सांडपाण्याचे प्लांट असलेल्या टाकीजवळ शिरला. सुदैवाने, समीर शेख या मेंटनन्सच्या कर्मचाºयाने प्रसंगावधान राखून प्लांटच्या खोलीच्या मुख्य दरवाजाची कडी बाहेरुन लावून घेतली. बिबटया आत शिरल्याची माहिती तोपर्यंत हॉटेलच्या इतर कर्मचा-यांना आणि ग्राहकांनाही मिळाली. त्यामुळे हॉटेल प्रशासनासह कर्मचा-यांच्या पाचावर धारण बसली. तोपर्यंत त्याला कोरम मॉलच्या परिसरात शोधणा-या वन विभागाच्या विविध पथकांना ही माहिती मिळाल्यानंतर ही पथकेही तिथे दाखल झाली. बेसमेंटमधील एका पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे आडोशाला तो लपला होता. ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई, बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी वाघमोडे आणि ठाण्याचे वनअधिकारी दिलीप देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली वन्य जीव विभागाच्या ५० जणांच्या विशेष पथकांनी सत्कार हॉटेलचा ताबा घेतला. सकाळी ७ ते ११या चार तासात बिबटयाची काहीच हालचाल न झाल्याने त्याच्या दिशेने दोन कोंबडया सोडण्यात आल्या. त्याच्या हालचालीनंतर रेस्क्यू टीममधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पेठे यांनी ट्रॅन्क्वीलायझेशन या इंजेक्शनद्वारे त्याला ११.३० वा. च्या सुमारास भूल दिली.दहा ते १५ मिनिटांनी त्याला भूल चढल्याची खात्री झाल्यानंतर ११.४५ वा. च्या सुमारास त्याला वनविभागाने एका लोखंडी पिंज-यात ठेवून एका विशेष वाहनाने बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात सोडले. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिका-यांकडून उपचार करुन नंतर खुल्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे हेही उपस्थित होते.सुदैवाने बचावलो...बिबटया शिरला तिथेच हॉटेलचे हिरालाल टेमरे, प्रताप जेना आणि समीर शेख आदी कर्मचारी होते. तो थेट अडगळीच्या खोलीत शिरल्यामुळे सुदैवाने बचावल्याची भावना त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.........................
नियोजनातून मोहीम फत्ते‘‘सकाळी ८ वा. सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबटया लोकेट झाला. त्यानंतर नियोजन करुन तीन तासांमध्ये विविध पथकांच्या मदतीने त्याला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडले.जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे.’’..................................